
‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाबरोबरच गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या विशेष उपक्रमांमुळे खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांपैकी चार हजार मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून कोरोना काळात गेल्या वर्षी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम राबविण्यात आला होता. यात सुमारे 800 शाळा स्मार्ट झाल्या. या उपक्रमामुळे शाळांचे लूक बदलले. यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. या उपक्रमाची दखल राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत शाळांची पाहणी केली होती. हा उपक्रम राज्यस्तरावर राबविण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिल्या होत्या.
सोलापूर जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिले जात नाही. मुलांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत, असा समज बाळगून बहुतांश पालक मुलांना खासगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेताना दिसून येत होते. मागील वर्षभरापासून गावातील जिल्हा परिषदेची शाळाच इंग्रजी शाळांप्रमाणे सुरू झाल्याने पालक व मुलांना या शाळेची गोडी लागली आहे.
सोलापूर जिह्यात सुमारे साडेतीन हजार प्राथमिक शाळा असून, यातील 800 शाळा लोकवर्गणीतून स्मार्ट झाल्या आहेत. विषय शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत. कोरोनाकाळात मागे राहिलेला अभ्यासक्रम जादा तास घेऊन पूर्ण करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळांकडे लक्ष केंद्रित केल्याने शाळांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. ही पटसंख्या पाच लाख 20 हजारांवर गेली आहे.
पहिल्या दिवशी पाठय़पुस्तकांचे वाटप
सर्वशिक्षा अभियानातून प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठय़पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आली आहेत. मुलींना व मागासवर्गीय मुलांना गणवेशही देण्यात आले आहेत. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलांना पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुलांना बेंचही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
इंग्रजी विषयाची संपूर्ण तयारी
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या शाळेत सेमी अभ्यासक्रम नाही, त्या शाळेत मुलांना किमान इंग्रजी विषयासह अन्य विषयांची तयारी शिक्षकांकडून करून घेण्यात येत आहे. स्पर्धात्मक युगात आवश्यक असणारी सर्व शिक्षणपद्धती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आल्याने या शाळेतील पटसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.






















































