
>> प्रा. सचिन बादल जाधव
महाराष्ट्र राज्याने 1995 मध्ये राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून नागरी व घरगुती सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण कमी करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया पेंद्र उभारणे, नदीघाटाचा विकास करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागृह बांधणे इ. योजनांची जर कडक अंमलबजावणी केली तर नक्कीच जलप्रदूषणाची समस्या संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.
जलप्रदूषण ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जलप्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण ही प्रक्रिया आहे.
नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. पॅनडा, चीन, हिंदुस्थान, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.
मानवी वस्त्यांमधून उत्सर्जित झालेले मलमूत्र आणि औद्योगिक अपशिष्टातील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नदी, समुद्र किंवा इतर जलाशयांत टाकले जातात. पाण्यात अति प्रमाणात कार्बनी पदार्थ असल्यास सूक्ष्म जीवांची ऑक्सिजनची मागणी वाढते, परंतु पाण्यातील ऑक्सिजनची उपलब्धता घटते. त्यामुळे परिस्थितिकीय संतुलन बिघडते व प्रदूषकांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्यांमधून कार्बनी अपशिष्टे पाण्यात सोडल्यामुळे या अपशिष्टांमार्फत ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यामुळे जलप्रदूषणाची तीव्रता वाढते.
सांडपाणी व मैला वाहून नेणाऱया वाहिन्यांमध्ये रोगांचे सूक्ष्म जीव असतात. अशा पाण्यावर संस्करण केल्यास काही सूक्ष्म जीवांचा नाश होतो, तर काही जिवंत राहतात. असे पाणी इतर जलाशयांत मिसळल्यास ते पाणी प्रदूषित होते. मैलापाण्याची सोय नीट न लावल्यास त्यामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे जठर आणि आतड्याचे रोग संभवतात.
शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावे यासाठी शेतजमिनीत रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. ही खते जोराचा पाऊस पडल्यास ओहोळ, जलप्रवाह यांतून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या या रासायनिक खतांमुळेही जलप्रदूषण होते. जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपात पाझरून भूजल साठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते.
काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाचा उपयोग शैवालांच्या पोषणासाठी होतो. त्यामुळे शैवालांची वाढ जलद व दाट होते. मात्र, इतर वनस्पतींची वाढ खुंटते. तसेच माशांना धोका पोहोचतो. कालांतराने इष्ट प्रमाणात पोषक द्रव्ये न मिळाल्यास शैवालांचा लवकरच नाश होतो. ही मृत शैवाले कुजतात व अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव त्यावर वाढतात. ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजलेल्या शैवालांमुळे पाण्याला दुर्गंधी सुटते.
आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशके, कवकनाशके, तणनाशके इ. रसायनांचा वापर केला जातो. त्यामध्ये विषारी द्रव्ये असतात. त्यांचा अल्पांश पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो.
कारखान्यातून बाहेर पडलेले रासायनिक पदार्थ जलाशयात सोडल्यास त्यातील पाणी प्रदूषित होते. पॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते. अशा पाण्याचा उद्योगासाठी व पिण्यासाठी उपयोग होत नाही. औद्योगिक अपशिष्टातील विषारी रसायने पाण्यात मिसळल्यास त्या जलाशयातील जैविक क्रियांमध्ये बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी आम्लीय होते. अशा पाण्यामुळे जलाशयातील सजीवांचा नाश होतो. हिंदुस्थानात चर्म, कागद, लगदा, वस्त्र, रसायने इ. उद्योग जलप्रदूषणास कारणीभूत आहेत.
पाण्यातील गाळामुळे जलाशय गढूळ होतात. गाळाचे थर जमा होऊन कधी कधी जलाशय गाळाने भरून जातात. जलप्रवाहास गाळाचा अडथळा होऊन मैलापाणी व सांडपाणी कोंडले जाऊन चिकट गाळ खाली बसतो. त्यात विनॉक्सिजीवी सूक्ष्म जीव निर्माण होतात. त्यामुळे काही अंशी गाळाचे अपघटन होते. मात्र, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व हवेतील कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढते. विनॉक्सिजीवी सूक्ष्म जीवांमुळे हायड्रोजन सल्फाईड हा वायू पाण्यात मिसळतो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.
पाण्याची निक्षरीकारक संयंत्रे, औष्णिक विद्युत निर्मिती, रासायनिक व पोलाद कारखाने, अणुकेंद्रीय संयंत्रे अशा अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणाऱया आस्थापनांतून बाहेर पडणारे पाणी अतिउष्ण असते. हे पाणी इतर जलाशयांत सोडल्यास ‘औष्णिक प्रदूषण’ होते. अशा अनैसर्गिक उष्णतेमुळे तेथील पाण्यातील सजीवांच्या जीवनचक्रास बाधा येते व परिसंस्थेचे संतुलन बिघडते.
कधी कधी समुद्रपृष्ठावर अपघात घडून येतात. त्यामुळे जलप्रदूषण होते. खनिजे व ज्वालाग्राही तेलाची वाहतूक बहुधा जहाजांतून होत असते. त्यांतील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे पक्षी, मासे व इतर जलचर तसेच पाणवनस्पती मृत्युमुखी पडतात. सागरी संसाधनांचा ऱहास होतो. समुद्रकिनाऱयावरील खनिज तेल परिष्करण कारखान्यांतून, विहिरींतून व साठवण टाकीतून काही प्रमाणात गळत राहते व पाझरत राहते. हे तेलही समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषण होते. अशा दुर्घटनांमुळे माशांना धोका निर्माण होतो. तेल परिष्करण कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी जीवांची निपज होऊ शकत नाही. साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना त्यांतील खनिज तेल, पेट्रोल, केरोसीन, डांबर इ. पदार्थ पाण्यात मिसळतात व प्रचंड प्रमाणात मासे मरतात. समुद्रपृष्ठावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी प्रमाणात मिसळतात. त्यामुळे सागरी जल व वातावरण यांच्यातील ऑक्सिजन विनिमय प्रक्रिया मंद होते.
महाराष्ट्रात जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नद्यांतील पाण्याच्या दर्जाचे संनियंत्रण 48 ठिकाणी नियमितपणे केले जाते. या 48 पैकी 35 ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र राज्याने 1995 मध्ये राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून नागरी व घरगुती सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण कमी करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया पेंद्र उभारणे, नदीघाटाचा विकास करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागृह बांधणे इ. योजनांची जर कडक अंमलबजावणी केली तर नक्कीच जलप्रदूषणाची समस्या संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.



























































