सीबीएसई बारावीच्या निकालात 7 टक्क्यांची घट, एकूण निकाल 92.71 टक्के, तर पुणे विभाग 90.48 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी लेखी परीक्षा झाली नव्हती. यंदा प्रथमच दोन सत्रांत परीक्षा पार पडल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 7 टक्क्यांची घट झाली आहे. सीबीएसई मंडळाच्या एकुण 16 विभागापैकी यंदाही सर्वाधिक निकाल त्रिवेंद्रम विभागाचा (98.83 टक्के) असून पुणे विभागाचा निकाल 90.48 टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल प्रयागराज विभागाचा 83.71 टक्के इतका आहे.

यंदा 14 लाख 35 हजार 366 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 13 लाख 30 हजार 662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालाच मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.54 टक्के इतका तर मुलांचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. तर ट्रान्सजेंडचा निकाल मात्र 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 3.29 टक्क्यांनी अधिक आहे. सीबीएसई मंडळाची बारावीची टर्म-2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत देश-विदेशातील 15 हजार 79 शाळांतील 6 हजार 714 परीक्षा पेंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेत तब्बल 1 लाख 4 हजार 704 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत. परदेशातील शाळांचा निकालही घटला असून यंदा 93. 98 मुले उत्तीर्ण झाली आहेत.

संस्थानिहाय निकालाची टक्केवारी

n जेएनव्ही – 98.93
n सीटीएसए – 97.96
n केव्ही – 97.04
n सरकारी अनुदानित – 94.81
n सरकारी – 93.38
n खासगी – 92.20

पुढील वर्षाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून

सीबीएसईने यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने बारावीच्या पुढील वर्षाच्या परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे.

अशी झाली होती परीक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बारावीची परीक्षा दोन टर्ममध्ये झाली. टर्म-1 ची परीक्षा ही डिसेंबरमध्ये ओएमआर पद्धतीने घेण्यात आली होती. तर त्यासाठी विविध प्रकारच्या अॅप आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. टर्म-1 साठी थेअरीचे 30 टक्के आणि उर्वरित टर्म-2 साठी 70 टक्के वर आधारीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही टर्ममधील गुणांच्या आधारावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

33 हजार 432 विद्यार्थी 95 टक्क्यांच्या पुढे

या परीक्षेत तब्बल 33 हजार 432 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 1 लाख 34 हजार 797 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे आहेत. तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना निकाल 93.11 टक्के इतका लागला असून 4 हजार 395 पैकी 4 हजार 92 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील 292 विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त तर 63 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.