किल्ले पन्हाळगडावर खुलेआम दारूपार्टी, शिवप्रेमींमधून संतापाची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज तसेच मावळ्यांच्या शौर्यशाली पराक्रमाने आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ऐतिहासिक पन्हाळा किल्ला एकीकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे ढासळत आहे. त्यातच आता काही उच्चभ्रू पर्यटकांकडून खुलेआम दारूपार्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातील या दारूपार्टीचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळू लागली आहे.
पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रात किल्ल्याच्या पावित्र्याचा कसलाही विचार न करता काही उच्चभ्रू पर्यटकांची बिनधास्त सुरू असलेली दारूपार्टी आणि विशेष म्हणजे यामध्ये महिलाही दारू पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यामुळे शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली. एरव्ही सर्वसामान्यांच्या वाहनांची तपासणी करून कारवाई करणाऱया पोलीस आणि गडावरील रहिवासी अशा पाटर्य़ांकडे लक्ष का देत नाहीत, असा सवाल करत संबंधित पर्यटक तसेच झुणका-भाकरी व्यावसायिकांवरही कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

सध्या हा किल्ला केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. याठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अलीकडे अतिवृष्टी तसेच पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे येथील काही वास्तू ढासळत आहेत. शिवप्रेमींकडून आंदोलनाच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. त्यातच हा दारूपार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आज हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवप्रेमींनीही या प्रकाराचा तीव्र निषेध करून किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आणणाऱया तसेच अवमान करणाऱया संबंधित पर्यटकांसह त्या झुणका-भाकर विक्री करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करण्यासह गडकोट किल्ले संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणीही केली.