
भडकंबा गावच्या विशेष ग्रामसभेत गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला. आता या गावात विधवेचे ना कुंकू पुसले जाणार, ना बांगडी फोडली जाणार.. ना जोडवी काढली जाणार…सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आणि विधवा प्रथा बंद करुन भडकंबा गावाने जिल्ह्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. या ग्रामसभेला सरपंच बापू शिंदे यांनी विधवा प्रथा बंदीची संकल्पना मांडली व त्याविषयची माहिती ग्रामसभेला त्यांनी दिली. या आधी काही दिवस गावातील सर्व वाडी मध्ये जाऊन ज्येष्ठ गावकरी ,मानकरी यांच्याशी चर्चा केली.
विधवा महिलांनाही सन्मानाने जगता यावं व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावं, यासाठी गावकऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळीं व महिलावर्ग एकत्रित येत हा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला.
कायद्याने समानतेचा अधिकार सर्वांना दिला आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेने सर्वस्वच गमावलेलं असतं. अशातच तिच्या अंगावरील सौभाग्याचे अलंकार काढणे, तिच्या कपाळावरचं कुंकू पुसणे, जोडवी काढणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपण मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले आणि सर्वांनी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी शिक्षिका प्रभा जाधव शेंडे मॅडम, रसिका शिर्के, अर्चना कांबळे, मीरा लोध, मधु आठल्ये, आबा कानिटकर, जावेद साठविलकर, दाभोळकर व सुमारे 125 ते 140 ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच बापू शिंदे यांनी यावेळी ही संकल्पना मांडत एक नवा आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांनी त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानले.गावच्या एकजुटीचे कौतुक केले. कायमच आमचा गाव विधायक कामात अग्रेसर असतो आणि राहील असा आशावाद व्यक्त केला.


























































