>> अनिल कुलकर्णी
शिरीष पैंनंतर हायकू संवर्धनात सिंहाचा वाटा असणारे तुकाराम खिल्लारे यांनी संपादित केलेला ‘निसर्गसृष्टी’ हा प्रातिनिधिक हायकू संग्रह, ज्याच्यामध्ये 1470 हायकू आहेत, ते केवळ निसर्ग या विषयातील आहेत. पहिल्यांदाच 210 ‘हायकू’कारांचे हायकू तुकाराम खिल्लारे यांनी एकत्रित संपादित केले आहेत. प्रत्येक हायकूमध्ये निसर्ग डोकावतों. कमीत कमी शब्दांत व तीन ओळींमध्ये विशाल निसर्गाला एकवटून एक मनोहर इंद्रधनुष्य प्रत्येक हायकूमध्ये साकारला आहे. रंगाची उधळ शिस्तीत असेल तरच इंद्रधनुष्य अवतरतो, त्याप्रमाणेच शब्दांची मांडणी शिस्तबद्ध व आशयपूर्ण असेल तरच हायकू मनाला स्पर्शून जातो. हायकू हा जपानी काव्य प्रकार. हायकूत किमान एक किगो म्हणजे ऋतुदर्शक शब्द असावा असे मत असणारा एक प्रवाह आहे, तर दुसरा प्रवाह कोणतीही अट न स्वीकारता कोणत्याही विषयावर हायकू लिहिणाऱयांचा गट आहे. हायकूमध्ये पाच-सात-पाच अशी शब्दरचना असते.
हायकूतील भाव, आशय हृदयाला किती भिडतो हे पाहत असताना नुसतीच चाकोरीबद्ध शब्दांची जुळवाजुळव केली तर तयार झालेले कृत्रिम हायकू मनाचा ठाव घेत नाहीत.
आशय हा हायकूचा प्राण असतो. हायकूमध्ये का, कशासाठी व काय लिहिले हे मनात स्पष्ट हवे.
हायकूमध्ये पूर्ण वर्तमानकालीन क्षण आणि दोन स्पष्ट बिंबे असावीत. दोन स्वतंत्र बिंबे हायकूत असतील तर आशयात गूढार्थ निर्माण करता येतो. हायकू एक वाक्य वाटू नये. हायकूमध्ये सर्वनाम नसावे, प्रश्नचिन्ह नसावे.
हायकूचा उगम तांका प्रकारातून झाला आहे. तांका हा जपानी लोकांचा एक विरंगुळा (एक खेळ) होता. पहिला कवी पहिल्या तीन ओळी लिहायचा (हायकू) आणि दुसरा हा त्या पहिल्या तीन ओळीला दोन ओळी जोडायचा. यातून तांकाची निर्मिती झाली. हायकू हा जपानी काव्य प्रकार आता मराठीमध्ये चांगलाच जम बसवत आहे. शिरीष पै यांनी लावलेले रोपटे चांगलेच बाळसे धरत आहे. तुकाराम खिल्लारे यांनी ‘असेही माझे हायकू’ 2010 मध्ये तसेच ‘हायकू भीमाचे’ याचे संपादन 2019 मध्ये केले. ‘सूर्य चुनिंदा हायकू’, ‘निवडक हायकू’ याचेही संपादन 2019मध्ये केले.
हायकूमध्ये क्षण वा कल्पना व भावना टाळून केवळ दृश्य, तेही अलिप्तपणे व्यक्त व्हायला हवे. काव्याचे गुण म्हणजे अलंकार, उपमा, कल्पना, भावना, घनता इत्यादीचा दर्जेदार उपयोग आवश्यक असेल तरच अंकांमध्ये करावा. संवेदनशीलता आणि तरलता जपायला हवी. तांका लिहिणारा उत्तम कवी असेल तर काहीच अवघड नाही. तांकामध्ये कोणतेही बंधन नाही. यमक असावेच असे नाही. निसर्ग बिंबदेखील अनिवार्य नाही. कविता सर्वच कवी लिहितात, पण यातले थोडेच वाचकांच्या स्मरणात राहतात. याचे कारण त्या कवीची कविता त्याच्या हृदयाला स्पर्शून जाते. असे हृदयस्पर्शी तांका लेखन कवितेचा प्रकार आहे. यात कवीला भावभावना व विचार उत्तमरीत्या व्यक्त करता येतात. जपानमध्ये तांका हा प्रकार सुरुवातीला लिहिला गेला तेव्हा हायकूचा उगमही झाला नव्हता. कालांतराने हा प्रकार प्रचलित होऊन त्याला स्वतंत्र रूप दिले गेले. उत्तरोत्तर याची प्रगती होत गेली म्हणून हायकूचे नियम लागू नाहीत. तांका व हायकूचा परस्परसंबंध नसला तरीही पहिल्या तीन ओळींमुळे ते परस्परपूरक आहेत असे म्हणायला हरकत नसावी. फरक इतकाच की, हायकू विकसित झाला आणि तांका जिथल्या तिथेच राहिला.
आशयपूर्ण शब्दांची बंदिस्त रुणझुण हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
निसर्गसृष्टी
लेखक ः तुकाराम खिल्लारे
प्रकाशक ः अनुदिन प्रकाशन, परभणी
पृष्ठs ः 220, मूल्य ः रुपये 300/-




























































