
>> रश्मी वारंग
आपल्या जिभेला मोहकणारे अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतीलच असे नाही. मात्र तरी पण आपल्याला ते खायचा मोह होतो. कुरकुरीत, खमंग केफर्स त्यापैकी एक. त्या केफर्सची गोष्ट तितकीच चटपटीत आहे.
1817 साली प्रसिद्ध झालेल्या विल्यम किचनर या शेफच्या ‘द कुक ऑरॅकल’ या पुस्तकात वेफर्सच्या पाककृतीचा पहिलावहिला उल्लेख आढळतो. किचनर लिहितो, ‘असे छान मोठे बटाटे घ्यावेत. ते सोलून त्यांच्या चकत्या कापाव्या. त्यावर लिंबू पिळून स्वच्छ कपडय़ात ते वाळवावे. नंतर सुकल्यावर तळावे.’ ही वेफर्सची आद्य पाककृती.
खऱ्या अर्थाने वेफर्सना लोकप्रिय करणारी घटना मात्र जॉर्ज क्रम या शेफशी जोडलेली आहे. न्यूयॉर्क… अमेरिकेतील सॅराटोगा स्प्रिंग या भागातील जॉर्ज म्हणजे एक प्रथितयश शेफ. जॉर्जच्या रेस्टॉरंटमध्ये एकदा एक खवचट महाशय खाण्यासाठी आले. त्यांनी फ्रेंच प्राईजची मागणी केली. फ्रेंच प्राईज समोर आल्यावर मीठच कमी आहे, खूपच जाड आहेत, अशा चुका काढत गिऱहाईकाने दोनदा डिश परत पाठवली. नामवंत शेफ असणाऱया जॉर्जला रागच आला. त्या रागात जॉर्जने जरा अतिपातळ आणि जास्तीचं मीठ भुरभुरवलेले काप तळून गिऱ्हाईकाला दिले. घे पठ्ठय़ा! अजून किती पातळ हवे ते बोल. असा जॉर्जचा आविर्भाव होता. पण घडलं उलटंच. गिऱहाईकाला तो रागाच्या भरात दिलेला पदार्थ विलक्षण आवडला. आणि तो पदार्थ म्हणजे हे आपले लाडके वेफर्स. त्या प्रांताच्या नावावरून त्यांना ‘सॅरागोटा चिप्स’ म्हटलं गेलं.
वेफर्स आपल्या देशात ब्रिटिशांच्या प्रभावातून आले. मुळात बटाटा हे कंदच पोर्तुगीजांसोबत आपल्या देशात आलं, पण ते लोकप्रिय झालं ब्रिटिश राजवटीत. बटाटा वेफर्सचा प्राण म्हणजे त्यांचा कुरकुरीतपणा. तो गेला की वेफर्सची अवस्था हवा गेलेल्या फुग्यासारखीच. हा कुरकुरीतपणा टिकवणारी खास बॅग किंवा रॅपर प्रथम 1953 साली लॉरा स्कुडरने शोधलं. या वेफर्सच्या कुरकुरीतपणाची महती अशी की, वेफर्स खाताना तो कुरुम कुरुम आवाज जर नसेल तर खाणाऱयाचा त्यातला रस कमी होतो हे संशोधकांनी संशोधनातून सिद्ध केलं.
साधारणपणे आपण वेफर्स घेताना ते मोडलेले नाहीत ना? हे तपासून घेतो. पण गंमत अशी की ‘फेल चिप्स’ नावाचा ब्रॅण्ड चक्क वेफर्सचा तळाचा चुरा विकतो. त्यांचा दावा आहे की तोच वेफर्सचा खरा स्वाद.
काही असो, गेली अगणित वर्षे उपवासापासून बर्थडे पार्टीपर्यंत आणि टाइमपास चटरपटरपासून घरगुती समारंभापर्यंत वेफर्स यत्र तत्र सर्वत्र असतातच.
मित्रमैत्रिणींसोबत जमलेली मैफल असो किंवा एकटय़ाने खाणे…वेफर्सचं पाकीट उघडल्या उघडल्या गायब होतं. आता बस! असं मेंदू सांगत असताना हात मात्र तोंडात वेफर्स सरकवतच राहतो. तो कुरुम कुरुम आवाज, तो थोडासा खारट चटपटीतपणा अखेर जिंकतो.’ आरोग्यास हानिकारक अशी घंटा डोक्यात वाजत असताना त्या एवढय़ाशा पातळ चकतीसमोर हार पत्करत आपण मान्य करतो…दिल है के मानता नहीं.
जगभरात क्रेझ
सध्याच्या काळात वेफर्स आबालवृद्धांना प्रिय आहेत. इतके प्रिय की, वर्ष 2022 मध्ये या वेफर्सची आर्थिक उलाढाल आहे. 40.3 बिलीयन डॉलर्स!!! या बटाटा वेफर्सची राजधानी होण्याचा अर्थात पोटॅटो चिप्स कॅपिटलचा मान पेनेसिलिव्हियाचा आहे.
























































