
शनिवारी कमबॅक केलेल्या पावसाने दोन दिवस खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. धुवाँधार पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले काही ठिकाणी रस्त्याला दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण भागात वीज वाहिन्यांवर झाड्यांच्या फांद्या मोडून पडल्याने काही गावांचा वीज पुरवठा देखील खाडीत झाला होता. 15 जुलै पर्यंत तालुक्यात पावसाचा धिंगाणा सुरु होता. मात्र 16 जुलै पासून पावसाने अचानक विश्रांती घेतली आणि जवजजवळ पंधरा दिवसाने तालुकावासीयांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.
१६ जुलै पासून गायब झालेला पाऊस शनिवार दिनांक 6 ऑगस्ट पर्यंत उगवलाच नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली होती. शेतात केलेली लावणी फुकट जाण्याच्या भीतीने शेजारी हवालदिल झाले होते. कधी एकदा पावसाचे पुनरागम होत आणि धोक्यात आलेली शेती वाचते हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यामुळे शेतकरी वरुण राजाची प्रार्थना करू लागले होते. अखेर वरुण राजाने शेतकऱ्यांची प्रार्थना ऐकली आणि शनिवार पासून खेड तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागम झाले.
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी सुरु झालेल्या पावसाचा जोर दुपारी वाढला आणि खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि खेड दापोली मार्गावरील नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याने या दोन्ही नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने शहरातील व्यावसायिक आणि नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या ईशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नद्या नाले देखील दुथडी भरून वाहू लागले असल्याने शेतीच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या शेतकऱ्यांनी नदी- नाले ओलांडताना खबरदारी घ्यावी अशे आवाहन करण्यात आले आहे.
काही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खेड तालुक्यातील असगाणी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर ओद्योगिक वसाहतीच्या कामामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने हा मार्गावरून वाहने हाकताना चालकांचा कास लागत आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आदळून वाहनाचे नुकसान देखील होऊ लागले आहे. येथील ग्रामस्थांनी याबाबत औद्योगीक वसाहतीकीकडे तक्रारी केल्या मात्र दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.




























































