
शिरूर, आंबेगाव तालुक्यातील शेती,पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमाशंकर खोऱ्यातून,पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठीच आवक धरणात होत आहे.
आज शनिवारी डिंभा धारण जवळपास 95 टक्के भरले असून दक्षता म्हणून घोडनदी पात्रात शुक्रवारपासून धरणातून 4500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती डिंभे धरण शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली. तर घोडनदी काठच्या गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन ही चिखले यांनी केले आहे.
दरम्यान पुढे पाऊसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून घोड नदी पात्रात केव्हाही जादा पाणी सोडण्यात येईल. नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन ही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. घोडनदी पात्रात पाण्याची वाढता प्रवाह पाहता शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, टाकळी हाजी, फाकटे, पिंपरखेड, चांडोह, आमदाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.

























































