
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केला. या राजकीय बदलानंतर नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. पण यानंतरही बिहारमधील राजकीय परिस्थितीत सतत उलथापालथ सुरू असल्याचं चित्र आहे.
नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन झाली असली तरी आता तिथे खातेवाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, एनडीएला आणखी एक धक्का बसणार असल्याचं वृत्त आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीएचे तीन खासदार जदयू आणि राजदच्या समर्थनार्थ भूमिका घेऊ शकतात. हे तिघेही लोक जनशक्ती पक्षाचे खासदार आहेत.
2019मध्ये लोक जनशक्ती पक्षाचे सहा खासदार निवडून आले होते. गेल्यावर्षी या पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांमध्ये विभागला गेला. पारस यांच्यासह 5 खासदार होते तर चिराग यांच्यासह 1 खासदार होता. यातील तीन खासदार एनडीएची साथ सोडणार आहेत.
खगडिया येथील खासदार मेहबुब अली कैसर हे राजदमध्ये तर वैशालीच्या खासदार वीणरा देवी आणि नवादाचे खासदार चंदन सिंह हे दोघं जदयूत सहभागी होऊ शकतील, अशी चिन्हं आहेत.




























































