
लातूर रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान विशेष पथकास दोन इसम एका मोटरसायकलवर शाहू चौक परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता तब्बल तेरा मोटरसायकल सह सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. आणि अशा प्रकारे लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्यांचा छडा लावण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या विशेष पथक पोलीस या गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत होते. 8 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान विशेष पथकास दोन इसम एका मोटरसायकल वर शाहू चौक परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आले. नमूद पथकातील पोलिसांनी मोटरसायकलस्वारांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विशेष पथकातील पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणाऱ्या संशयित इसमांना रिंग रोड जवळील गुळ मार्केट परिसरात ताब्यात घेतले.
शुभम उर्फ सुग्रीव जरीचंद कुंभकर्ण, (28 वर्ष, राहणार घारगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. सध्या राहणार एलआयसी कॉलनी, लातूर) आणि गोपाळ सखाराम माने (29 वर्ष,राहणार रुई धारूर तालुका धारूर जिल्हा बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल काही दिवसांपूर्वीच चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलचे चेसिस व इंजिन नंबरची पडताळणी केली असता सदरची मोटरसायकल पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 348/2022 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल गुन्ह्यातली असल्याचे निदर्शनास आले. नमूद आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक तसेच पोलीस ठाणे आनंदनगर जिल्हा धाराशिव. पोलीस ठाणे फौजदार चावडी, सोलापूर येथील विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे कबूल करून ते सध्या वापरत असलेली मोटरसायकल व त्यांनी इतर ठिकाणी लपवून ठेवलेल्या 12 मोटरसायकली अशा एकूण 13 मोटरसायकली नमूद आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या आहेत. 6 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मोटारसायकल चोरीतील आरोपी त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली अतिशय कमी किमतीत लोकांना भूल थापा देऊन विक्री करणार होते असे कबूल केले. आरोपींकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस अमलदार मंथलवाड हे करीत आहेत.





























































