
>> उदय जोशी
अत्यंत सामान्य कुटुंबातून राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या विनायकराव मेटे यांची राजकीय वाटचाल थक्क करणारीच आहे. मात्र, आजची पहाटच त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी घेऊन धडकली. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर बोलावलेल्या बैठकीला बीडहून जाताना विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्प्रेस वेवर अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मनाला चटका आणि धक्का देणारी ही घटना होय. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्राची हानी झाली.
विनायक मेटे यांची कर्मभूमी मुंबई असली, तरी बीड जिह्यातील राजेगाव या गावात 30 जून 1963 रोजी जन्म झाला. प्राथमिक शिक्षण याच गावच्या शाळेत झाले. आपल्या शाळेत अनेक महापुरुषांची जयंती साजरी केली जात नसल्याने आठवीत असताना त्यांनी पहिले बंड शिक्षकांच्या विरोधात पुकारले अन् ग्रामस्थांच्या मदतीने शाळेत बंद पडलेल्या महापुरुषांच्या जयंत्या सुरू झाल्या. दहावी झाल्यानंतर त्यांनी बीड गाठले, अत्यंत साधारण परिस्थिती, होती ती जमीन बहिणीच्या लग्नासाठी विकून टाकली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, कशीबशी अकरावीची परीक्षा दिली अन् पुढचे शिक्षण थांबवत विनायक मेटे आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाले, मुंबईत असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे राहून सुरुवातीला त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
डोक्यावर टोपले घेऊन मुंबईत भाजी विक्री करत आपला चरितार्थ चालवू लागले, पण मन रमले नाही. हे काम सोडून ते आरसीएफ कार्यालयामध्ये शिपायाची नोकरी करू लागले. मात्र, याही ठिकाणी ते असमाधानी होते. त्यांचे मोठे बंधू मुंबईत पेंटरचा व्यवसाय करत होते. त्यांना मदत म्हणून विनायक मेटे यांनी हाती रंगरंगोटीचा ब्रश घेतला. एकीकडे हाताला काम शोधत असताना आणि दुसरीकडे भाकरीची भ्रांत असताना डोक्यात मात्र मराठा संघटनेचं चक्र सुरू होतं. याच काळात ते मराठा महासंघाच्या कार्यक्रमाला जाऊ लागले. या संघटनेत ते हिरिरीने काम करू लागले. मराठा समाजासाठीची तळमळ, त्यांच्यातील असलेले संघटन कौशल्य आणि आक्रमकपणा पाहून मराठा महासंघाने मेटे यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या. याच काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. भाजप-शिवसेनेची युती झाली. गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या जिह्यातील एक तरुण मराठा संघटन करत असल्याचे पाहिले आणि निवडणुकीत आपल्याला उपयोगी पडेल. या उद्देशाने विनायक मेटे यांना त्यांनी सोबत घेतले. 1995 च्या निवडणुकीमध्ये मेटेंनी चांगले काम केले. राज्यात युतीची सत्ता आली.
मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता विधान परिषदेवर घ्यायचा ठरले. स्व. गोपीनाथराव मुंडेंनी पुढाकार घेऊन मेटेंना राज्यपाल नामनियुक्त करून विधान परिषदेवर पाठवले. अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी 1 जानेवारी 1996 रोजी विनायक मेटे पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आपले कसब पणाला लावून आणि बूद्धीचातुर्यावर विनायक मेटे पाचवेळा विधान परिषदेवर सदस्य म्हणून राहिले. 1995 साली त्यांची मराठवाडा लोकविकास मंचच्या अध्यक्षपदी निवड झाली. 6 जानेवारी 2002 रोजी त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. 7 डिसेंबर 2016 रोजी भारतीय संग्राम परिषदेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अंमलबजावणी देखरेख व समन्वयक समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राजकारण करत असताना समाजकार्यातही त्यांचा सहभाग मोठा होता. पै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीडच्या वतीने 25 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळे त्यांनी राबविले. स्वतःचे लग्नही त्यांनी सामूहिक विवाहातूनच केले. बीड जिह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी अजित बालिका सुरक्षा योजना त्यांनी सुरू केली. त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने 2017 साली बीड जिल्हा परिषदेत 4 सदस्य निवडून आणले तर पंचायत समितीत 3 सदस्य विजयी झाले. त्यांच्या पक्षाचा उमेदवार जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाला.
व्यसनमुक्ती अभियान राबविण्यासाठी दरवर्षी 31 डिसेंबर रोजी बीडच्या जिल्हा स्टेडियमवर त्यांनी भव्यदिव्य कार्यक्रम घेतले. लढवय्या नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. मराठा समाजाचे संघटन करत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मुद्दय़ावर अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू होता. सत्ता कोणाचीही, असो मेटेंना शासन दरबारी सन्मान मिळत असे. विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करत असताना 2014 साली त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. सर्वच पक्षांत त्यांची ऊठबस असायची. मेटे यांच्या अकाली निधनाने एक सुसंस्कृत व दिलखुलास राजकारणी आपल्याला चटका लावून गेला आहे.


























































