
हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कस्तुरबा रुग्णालयातील गॅसगळती रोखण्याबद्दल जाहीर झालेल्या 7 राष्ट्रपती शौर्यपदक विजेत्या अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळयाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल यांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा शौर्यपदक जाहीर झालेल्या महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चहल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर निर्मला सामंत -प्रभावळकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू , डॉ. संजय कुमार, सहआयुक्त अजित कुंभार, सहआयुक्त, उपायुक्त, संचालक, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सव पुस्तिकेचे प्रकाशन
महापालिका सचिव खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणा-या “वार्षिक प्रकाशन 2022” चे प्रकाशन डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित ‘गणेशोत्सव पुस्तिका 2022’ चे प्रकाशन करण्यात आले. ‘बाबासाहेब वरळीकर’ यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस इकबालसिंह चहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
























































