अकरावीच्या तिसऱ्या यादीत कटऑफ वाढले, 1 लाख 43 हजार 10 पैकी 50 हजार 769 विद्यार्थ्यांचे प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी प्रवेश फेरी सोमवारी जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबईतील काही कॉलेजांचे कटऑफ दुसऱया यादीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले. या यादीत एकूण 1 लाख 43 हजार 10 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 50 हजार 769 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे. यातील 13 हजार 920 जणांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असून या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे, असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील एचआर कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ दुसऱया यादीत 92.6 टक्क्यांवर होता. मात्र तिसऱया यादीत कटऑफ 96.8 टक्क्यांवर पोहोचला. तर झेवियर्सचा आर्टचा कटऑफ 93.4 टक्क्यांवरून 95.6 टक्क्यांवर आला आहे. रूईया, रूपारेल कॉलेजमध्येदेखील हीच परिस्थिती असून रूईयाच्या आर्टचा कटऑफ 79.2 टक्क्यांवरून तिसऱया यादीत 92.8 वर पोहोचला आहे. तर रूपारेलचा सायन्सच्या कटऑफमध्येदेखील वाढ होऊन तिसऱया यादीतील कटऑफ 92.2 वर राहिला आहे. बहुसंख्य कॉलेजच्या आर्ट्सच्या कटऑफमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. साठये कॉलेजचा आर्ट्सचा कटऑफ 76.8 वरून 80.6 वर पोहोचला तर मिठीबाई कॉलेजचा कटऑफही 85.2 वरून 89.2 वर गेला आहे.

यामुळे कटऑफ वाढले

पहिल्या प्रवेश फेरीत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारणाऱया विद्यार्थ्यांना दुसऱया प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी नव्हती. अशा 12 हजार 219 विद्यार्थ्यांसाठी तिसऱया यादीत प्रवेश खुले झाले. या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार कॉलेज कटऑफ वाढल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या आणि दुसऱया गुणवत्ता यादीत 2 ते 10 पसंतीक्रमावरील कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश न घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. तिसरी प्रवेश फेरी ही शेवटची संधी असून यानंतर विशेष प्रवेश फेरी होईल. त्यामुळे तिसऱया यादीत अर्ज करणाऱयांची संख्या जास्त आहे.

शाखानिहाय झालेले प्रवेश
शाखा       एकूण जागा     अर्ज केले         प्रवेश
आर्ट्स       21,544       10,318        4357
कॉमर्स       77,904       79,904     31,253
सायन्स       41,784       52,107     14,824
एमसीव्हीसी     2370            681         335
एकूण      1,43,602    1,43,010     50,769