
अनेकदा आंदोलने करूनही धारावी पुनर्वसन योजना कार्यान्वित करण्यास राज्य सरकार अपयशी ठरलेय. या पार्श्वभूमीवर क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करू नका, असा इशारा माजी आमदार व धारावी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच धारावीकरांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारमार्फत होणारे धारावीचे पुनर्वसन हा धारावीकरांच्या अस्तित्वाचा विषय आहे. धारावीकरांच्या प्रचंड संघर्षानंतर 2004 साली तत्कालीन सरकारने धारावी पुनर्वसन योजना जाहीर केली.आतापर्यंत बैठकांवर 200 कोटी रुपये खर्च झाला, 8 ते 10 टेंडर निघाली, सर्वपक्षीय कृती समितीची अनेकदा आंदोलने होऊनही धारावी पुनर्वसनाला गती का मिळाली नाही, असा सवाल माने यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्र्यांनी अलीकडेच धारावीकरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे, याचे स्वागत आहे. परंतु क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली दिशाभूल करून धारावीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे माने यांनी म्हटलेय.























































