गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात, सांगलीत पारंपरिक देखाव्यांना पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सांगली शहरातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक हलते देखावे उभारण्याचे काम सुरू केले आहे. सांगली शहराला हलते देखावे उभारण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. यामध्ये पौराणिक, ऐतिहासिक व समाजप्रबोधनात्मक देखाव्यांचा समावेश असतो. हे देखावे पाहण्यासाठी सांगली शहरासह आसपासच्या गावांतून लाखो भाविकांची गर्दी होत असते. परंतु महापूर आणि दोन वर्षे कोरोना अशा दुहेरी संकटामुळे देखाव्यांचे प्रमाण कमी होते. परंतु यंदा मोठय़ा प्रमाणात देखावे उभारण्याचे काम गतीने सुरू असून, देखावे पाहण्यासाठी भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

यंदाचा गणेशोत्सव मोठय़ा उत्सवात साजरा होणार आहे. गेली 61 वर्षांची परंपरा असलेल्या सांगलीतील लक्ष्मीनारायण मंडळातर्फे यंदा 24 मूर्ती असलेला दहीहंडी हा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. या मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक पारितोषिक मिळवली आहेत. यंदाही हलत्या देखाव्यांची परंपरा या मंडळाने जपली आहे. यावर्षी देखावा उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. कापडपेठेतील मंडळांनी आपल्या हलत्या देखाव्यांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यावर्षी ‘भक्त प्रल्हादचा कडेलोट’ हा देखावा सादर करण्यात येणार आहे. यासाठी प्रसिद्ध मूर्तिकार कै. मच्छिंद्र यादव यांचे चिरंजीव बंडू यादव व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. मारुती चौक येथील विजयत मंडळाने दरवर्षीप्रमाणे काल्पनिक मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असून, या मंदिरात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मंडळाच्या वतीने दररोज दर्शनासाठी येणाऱया भाविकांना प्रसादाचं वाटप केले जाते. स्टॅण्ड परिसरातील रणझुंजार गणेशोत्सव मंडळाने यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. गावभागातील संग्राम चौक येथील गणेश मंडळाचे 51वे वर्ष असून, यंदा त्यांनी ज्वालासुराचा वध हा देखावा तयार करण्याचे योजले आहे. तसेच, इथे आकर्षक आरस व सजावटी करण्याचे काम सुरू आहे. स्टँड परिसरातील अष्टविनायक मंडळाच्या वारुळातून स्वामी समर्थांचे प्रकटन हा देखावा सादर करण्यात येणार असून, त्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.

शहरातील पटेल चौकाच्या वतीने 17 फुटी भगवान शंकराचे तांडवनृत्य हा स्वयंचलित देखावा दाखवण्यात येणार आहे. वखार भागातील मोटार मालक मित्र मंडळातर्फे द्रोणागिरी पर्वतासह हनुमान उड्डाण हा देखावा करण्यात येत आहे, तर कॉलेज कॉर्नर येथील सावकार गणपती मंडळातर्फे काली मातेकडून रक्तबीज दानवाचा वध या देखाव्याची तयारी सुरू आहे. कॉलेज कॉर्नरतर्फे लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येत आहे, तर झाशी चौक येथे वीस मूर्तींसह मराठय़ांचा सत्ता संघर्ष हा देखावा सादर होणार आहे. या सर्व मंडळांसह शहरातील विविध सार्वजनिक मंडळांतर्फे हलते देखावे उभारण्याचे काम जोरदारपणे सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे.