मातृत्व पेलताना..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Pretty woman holding a newborn baby in her arms

 >> मुलाखती : नमिता वारणकर 

आईपणासोबत येते एक प्रचंड मोठी जबाबदारी. जशी आई मुलाला जन्म देत असते तसेच बाळ आईला जन्म देत असते. या अतिशय महत्वपूर्ण घटनेने त्या स्त्रीचे सारे विश्वच बदलून जाते.. जबाबदाऱ्या बदलतात, प्राधान्यक्रम बदलतो.. पाहूया कसे वाटते हे आईपण पेलताना..!

 प्रा. रेखा दिवेकर

 

मातृत्व स्वीकारताना असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा मी ज्या काळात आई झाले त्यावेळी निसर्गक्रमानुसार लग्न झालं की, मूल होणं हे स्वाभाविकच धरलं जायचं. आता ‘पेट पेरेंटस् किंवा प्लान्ट पेरेंटस्’ असतात. काही लोकं ठरवतात की, आपल्याला मूल नको. त्याऐवजी आपण कुत्रा पाळू किंवा झाडं लावू. आमच्या वेळी आई व्हायचं की नाही, असं काही ठरवणं नव्हतं. साठ्ये महाविद्यालयात लेक्चरर होते. 12-13 वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यावेळी नोकरी करत असतानाच मला ऋजुता आणि अंकिता या दोन मुली झाल्या. मूल होतं त्यावेळचा आनंद शब्दातीत असतो.

त्यानंतरची जी माझी फेज होती. त्यामध्ये जरा अपराधी भावना होती, कारण जरी आपण म्हणजो की, आई होणं म्हणजे आनंद तर असतोच, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्या पण खूप असतात. आईवडिलांच्या दृष्टीने मुलं कितीही मोठी झाली तरी जबाबदाऱ्या संपत नाहीत. आता आपण विचारपूर्वक बाजूला होत असलो तरीही मनात कुठेतरी जबाबदारी असतेच. अर्थात आपण मुलांना पंख देतो, पण कायम मुलांबद्दल प्रकर्षाने जबाबदारीची भावना असतेच. याविषयी मला वाटतं की, जबाबदारी आणि आनंद या दोन्ही गोष्टी यामध्ये समसमान आहेत. या दोन्ही गोष्टीचा विचार व्हायला हवा, कारण आता कसं आहे, बऱ्याचशा मुलींना मातृत्व नको असतं. त्यांचा हा विचार असला, तर त्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. कारण अखेर त्यांनाच ही जबाबदारी निभवायची असते. हल्ली तर बऱ्याचशा मुली होतकरू ओरिएंटेड असतात.

आई झाले त्या काळी नोकरी करणं आजच्या इतकं कॉमन नव्हतं त्यामुळे मला गिल्ट यायचा. त्यावेळी नोकरी करत करत गाणंही शिकत होते. संगीत विशारद झाले. तेव्हा माझ्या घरातून बेजबाबदारपणाचा आरोप माझ्यावर झाला, पण तिकडे फार लक्ष न देता माझी आवड जपत गेले. त्यानंतर काही वर्षांनंतर दोन्ही मुली देवकृपेने व्यवस्थित सेटल झाल्या. ऋजुता (आहारतज्ज्ञ) तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, तर अंकितानेही अहमदाबादमधून मॅनेजमेंटची पदवी घेतली. सुरतमध्ये तिने पहिलं मॅनेजमेंट स्कूल तिने सुरू केलंय. तिथे एका वेळी अडीच हजार मुलं शिक्षण घेत आहेत. सुरुवातीपासून त्या स्वत:चं स्वत: काहीतरी वेगळं करतील, हे कळत होतं. यामुळे सगळ्यांचा सूर माझ्याकडे बघण्याचा बदलला. इतर नोकरी न करणाऱ्या बायका होत्या त्यांची मुलं आणि आमची मुलं यांची तुलना केली, असं झालं की आम्ही कुठेही कमी पडलो नाही. जितकी आई जबाबदारीने वागते म्हणजे ती घरातील, बाहेरचंही करते त्यामुळे मुलींना नोकरी करणारी आई असली की, जबाबदारीची जाणीव खूप लवकर होते. महाविद्यालयात केमिस्ट्रि शिकवलं असं नाही, तर म्युझिक क्लबची इन्चार्ज होते. वाड्.मय मंडळात थोडंफार काम करायचे. त्यामुळे मुलींना हेही कळलं की, थोडंसं मल्टिपॅकेटेड होण्याची गरज असते किंवा आपल्याच विकासासाठी झालेलं चांगलं असतं. यामुळे आपल्यातील स्मार्टनेस डेव्हलप होतो. यामुळे आधी जे इतरांना वाटायचं की, मी बेबजबाबदार आहे, ते आता उलट झालंय. मुलींचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा झाला असं मला वाटतं. याचं समाधान आणि आनंद आहे.

मूल ही फक्त आईची जबाबदारी नाही. समाजही आपल्या मुलाची वाढ होण्यात जबाबदार असतो. आपल्या मुलाची वाढ होत असताना शेजारीपाजारी कसे आहेत किंवा नातेवाईक कसे आहेत, हेही महत्त्वाचं आहे. आमच्या कुटुंबाचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे मुलांवर फक्त आईचेच संस्कार हवेत असं नाही, तर सगळ्यांचे संस्कार महत्त्वाचे असतात. ते आपणही होऊ द्यायला हवेत, असं मला वाटतं. प्रत्येकाचे दृष्टीकोन यासाठी वेगवेगळे असू शकतात. मला असं वाटतं की, आपण मुलांना इतरांमध्येही मिसळायला शिकवलं पाहिजे. आम्ही अंधेरी पश्चिमेला कॉस्मॉपॉलिटन सोसायटीमध्ये राहायचो. त्यामुळे सगळ्या जातीधर्माच्या मित्रमैत्रिणी त्यांना होते. एका ठराविक व्यक्तिसमुहामध्ये राहून जशी वाढ होते त्यापेक्षा वेगळी वाढ तुम्ही जेव्हा मिश्र समाजात राहून मोठे होता तेव्हा वेगळ्या प्रकारे होते, हे माझ्या आता लक्षात येत आहे. आपल्या स्वभावानुसार आणि निसर्गक्रमानुसार जसं होत गेलं तसं होत गेलं, यामध्ये आम्ही काहीही जाणीवपूर्वक केललं नाही.
वर्षा दांदळे , अभिनेत्री
 
मातृत्व…ही सर्वव्यापी संकल्पना आहे. फक्त बाळाला जन्म देणं हा फक्त तांत्रिक भाग झाला, मुळात आईपण हे  असावं लागतं. ते पुरुषांमध्येही असावं लागतं. ते फक्त बाईमध्येच असतं, असं नाही. आईपण असलं की, सगळ्या गोष्टीत मायेची पाखर आपोआप येते. प्रेम आणि विश्वासाच्या बळावर आपोआप जुळायला लागतात. मातृत्व ही व्यापक संकल्पना आहे की, माऊलीनेही सगळ्या जगासाठी पसायदान मागितलं आहे. हे माऊलीचं आईपणच आहे. आई आपल्या बाळाच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करता. बाळाने मला काय दिलं किंवा पुढे काय देणार आहे, असा विचार ती कधीच करत नाही. त्यामुळे हे वैश्विक असतं.
आईपण मी निसर्गासोबत रिलेट करते. निसर्गच आपली आई आहे, कोणतीही अपेक्षा न करता फुकट हवा, फुकट पाणी, फुकट सावली देतोय, पण तिला जपण्यासाठी आपण काहीच करत नाही. आपल्या आईकडेही एका विशिष्ट वयानंतर दुर्लक्ष करायला लागतो. तसंच निसर्गाच्या आईकडेही आपण दुर्लक्ष करायला लागलोय. ती दोन्ही हातांनी आपआपल्याला भरभरून देतेय, तितकं देणं आपल्याला शक्य नाही, पण आपल्याला तिची उतराई करणं खूपच गरजेचं आहे.
शिक्षकामध्येही आईपण असेल तर तो त्याच्या विद्यार्थ्यांना समजून घेऊ शकतो. कारण वर्गातली मुलं वेगवेगळ्या समाजातून, परिस्थितीतून आलेली असतात. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. पण शिक्षकातलं मातृत्व जागं असेल तर प्रत्येक मुलाकडे आईच्या नजरेने बघतो. मी या मुलाला कसं समजावलं  तर समजेल असा तो विचार करतो.
मातृत्व हा गुण आहे. तो विकसित झाला तर मानवतेला बळ देणारा ठरेल. कारण आपलं सगळं जर अपेक्षांनी भरलेलं आहे. आईपण हीच एक अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत नाही, त्यामुळे तुम्हीही आईसारखं निरपेक्ष प्रेम करायला शिकलं पाहिजे. ही गोष्ट शिकवून येत नाही. त्याकरिता तुमचे विचार तुम्हाला त्या दृष्टीकडे नेतात. त्यामुळे विचार मायेचा, प्रेमाचा असला पाहिजे. असं हे मातृत्व माझ्यासाठी सर्वव्यापी आहे.
विद्यार्थ्यासाठी त्यांची शिक्षिका किंवा शिक्षक आई झाला तर त्या मुलालासुद्धा शिकणं सोपं जातं. हल्लीचे काही शिक्षक मुलांशी उद्धटाने किंवा रागाने बोलतात. असे शिक्षक मुलांना शिकवू शकत नाहीत. सगळ्या संकल्पना शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये मातृत्वाची ओढ असणं खूपच गरजेचं असतं. कोरडेपणाने एखादी संकल्पना शिकणं मुलांना कठीण जातं.माझ्या मते, आईनंतर समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक शिक्षक आहे. नव्याने विद्यार्थ्यांना सगळ्या जगाची ओळख शिक्षक करून देतात. आता पूर्वीचे ‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’, हे दिवस गेले. आता मुलं सेन्सिटिव्ह झालंय. त्याला त्याच्या सख्ख्या आईकडूनही मायेची ओल मिळत नाही, कारण ती कमावण्याच्या गर्दीत शिरली आहे.ती नोकरी करू लागली आहे, म्हणून  मुलांना आईनंतर सगळ्यात जवळंच कोण असेल तर शिक्षक. त्यामुळे त्यांना  त्यांच्या आईपण जपावं लागेल. विकसित करावं लागेल. कारण निरपेक्षता हाच या  नात्याचा मूळ गुणधर्म आहे. याशिवाय मैत्रीतही मातृत्व असतं. आईपण हे प्रत्येक नात्यात असलं तरच प्रत्येक नातं अधिकाधिक सुदृढ होईल.