सोलापुरातील दलितवस्ती सुधारणेच्या कामात तफावत, राज्य शासनाच्या पथकाकडून चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची चौकशी करीत असताना दलितवस्त्यांच्या कामात तफावत असल्याचे प्राथमिकदृष्टय़ा दिसून आल्याची माहिती समाजकल्याण आयुक्तालयातील विशेष अधिकारी मनीषा फुले यांनी दिली आहे. कामात तफावत असणाऱयांचा अहवाल समाजकल्याण आयुक्तांकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजकल्याण विभागातील विविध योजनांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पथक दाखल झाले आहे. कार्यालयीन फायलींची कसून तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही किरकोळ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. मोहोळ, अक्कलकोट आदी ठिकाणच्या दलितवस्ती सुधारणा योजना कामकाजाची तपासणी करण्यात आली आहे. कामात तफावत असणाऱयांचा अहवाल समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे सादर करणार असल्याचे मनीषा फुले यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱया दलितवस्ती विकास योजनेची कामे वाटताना टक्केवारी घेतल्याचा आरोप डीपीसीत आमदार राम सातपुते यांनी केला होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार दिली होती. दरम्यान, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱया योजनांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची चौकशी सुरू झाली आहे.

समाजकल्याण समितीसमोर 10 जानेवारी 2022 रोजी 16 कोटी 50 लाखांचा निधी परस्पर वाटप केल्याची तक्रार सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. या तक्रारीसंदर्भात विचारणा करण्यासाठी त्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे मनीषा फुले यांनी सांगितले.