लेन्स आय – जिराफ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता कळमणकर

जिराफ हा जगातील सर्वात उंच सस्तन प्राणी आहे. हे सर्व जिराफ आपल्याला सारखेच वाटत असले तरी यांच्या अंगावरील नक्षीने ते विभागले जातात. जिराफ एकूण 4 प्रजातीत विभागले जातात. उत्तरीय जिराफ, रेटिक्युलेटेड जिराफ, दक्षिणी जिराफ आणि मसाई जिराफ. यांच्या पुढे 6 उपप्रजाती आढळतात. आफ्रिकेच्या  साधारण 15 देशांतील गवताळ कुरणात आढळणारा हा उंचच उंच, अतिशय सुंदर डोळ्यांचा आणि लांबलचक पायांचा हा प्राणी झपाटय़ाने नामशेष होत आहे. सोळा ते अठरा फुटांपर्यंत उंची असलेल्या या प्राण्याचे पायच मुळी सहा फुटांचे असतात लांबलचक मानेला  सात  मणके असून प्रत्येक मणका 10 इंचाइतका असतो. लांब पायांमुळे हा फार अंतर पळू शकत नाही. पण थोडके अंतर वेगाने पळतो. याच्या उंचीमुळे हा जसा आपल्याला खूप दुरून दिसतो तसेच यालाही शिकारी पटकन दिसतो.

लालसर तपकिरी रंगाचा कोट अंगावर असणारा हा प्राणी आपण नैरोबीवरून मसाईमाराकडे निघालो की वाटेत बरेचदा दर्शन देतो. या प्राण्याच्या नर आणि मादी दोघांनाही कातडीने झाकलेली छोटीशी  शिंगे असतात. उंचीमुळे झाडाच्या वरच्या भागातील कोवळा पाला सहज खातात. अकेशिया झाडाची पाने हे यांचे आवडते खाणे आहे. समूहाने राहण्याकडे जिराफांचा कल आहे. चालताना व रस्ता क्रॉस करून समोरून जाताना कळप पाहणे हा फार वेगळा अनुभव आहे. उंच पायांमुळे मान हलवत चालणे फारच गमतीशीर वाटते. यांची खरी पंचायत होते ती पाणी पिताना. समोरचे दोन्ही  पाय फाकवून मान  पूर्ण खाली झुकवून  अवघडत पाणी प्यावे लागते. या वेळी त्याच्यावर हल्ला करणे सिंहांना सहज सोपे होते, कारण पूर्वस्थितीत येऊन त्यांना पळायला वेळ लागतो. हा दोन तीन दिवसांनी एकदाच भरपूर पाणी पितो.

रेटिक्युलेटेड जिराफ हा अंगावर गडद लालसर, तांबडय़ा  चौकोन व त्या चौकोनाला सुरेख शुभ्र काठ असा सुंदर नक्षीचा प्राणी. सांबुरूच्या जंगलात याला खूप पाहण्याची संधी मिळाली. रॉथशिल्ड जिराफ हा उघडय़ा गवताळ प्रदेशात दिसतो. यांचे पाय गुडग्याखाली पांढरे असतात. नर जिराफाला छोटी छोटी पाच-सहा शिंगे असतात. मसाई जिराफ हा डार्क पांढऱ्या कातडीवर दाट  ब्राऊन रंगाची नक्षी असणारा असतो.  रॉथशिल्ड जिराफ ही मोस्ट endengered   प्राणी आहे. पूर्ण जगभरात 1671 रॉथशिल्ड आहेत. युगांडा, केनियाच्या काही भागात दिसतात. जिराफ हा प्राणी साधारण 25 वर्षांपर्यंत जगतो.

जिराफ आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ उभा राहूनच काढतो. फार कमी वेळा बसतो. हे पिलांना जन्मही उभे राहूनच देतात. सहा फुटांवरून खाली फेकले जाणाऱ्या पिलाचे स्वागत या जगात फारच निर्दयी पद्धतीने होते. त्यामुळेच पुढील अवघड जगण्याचे धडे मिळत असावेत, असे मला वाटते. यांचे पिलू जन्मानंतर अवघ्या एका तासात उभे राहते. हा प्राणी उभ्या उभ्याच डुलक्या काढतो. याची लाथ जर सिंहासारख्या प्राण्याला बसली तर जबरदस्त नुकसान करते.

योग्य वातावरणाचा अभाव, तसेच आफ्रिकेतील देशात खाण्यासाठी याची मोठय़ा प्रमाणत शिकार होते. कातडी अतिशय सुंदर, जाड व टिकाऊ असल्यामुळे बेल्ट, पर्सेस बनवण्यासाठी हे मारले जातात. जिराफाचे मेंदू व बोनमॅरो हे HIV  वर उपाय होतो या गैरसमजामुळेही यांची शिकार होते. आज जरी आफ्रिकेत हा सहजी दिसत असला तरी हा प्राणी झपाटय़ाने नामशेष होत आहे. 21 जून हा दिवस जागतिक जिराफ दिन म्हणून साजरा होतो.

[email protected]