मराठी विद्यार्थ्यांची भाषिक आवड सर्वोत्तम, केंद्राच्या पायाभूत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाषा समजणे, वाचन, चित्रांवरून वाक्य तयार करणे, अक्षर ओळख यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषा आकलनात देशाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मराठी भाषा आकलनात महाराष्ट्राची कामगिरी 83, तर देशाची 82 टक्के आहे. इंग्रजी भाषेत हे प्रमाण राज्य 88, देश 86 टक्के, तर हिंदी भाषेत राज्य 88, तर देश 85 टक्के असे आहे. भाषेबरोबरच 9 हजार 999 पर्यंतच्या अंक ओळखमध्येही राज्याचे विद्यार्थी सहभागी झाले. बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकारातही राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मार्च महिन्यात तिसरीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत अध्ययन अभ्यास नमुना सर्वेक्षण घेतले होते. या सर्वेक्षणात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी पुढे असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची इंग्रजी, मराठी आणि इतर विषयांतील वाचन क्षमता किंचित सुधारली असून अक्षरज्ञानामध्ये राज्यातील विद्यार्थी देशाच्या तुलनेत अधिक विकसित झाले असल्याचे समोर आले आहे. देशातील विद्यार्थ्यांची क्षमता 95 टक्के इतके असून राज्यातील विद्यार्थ्यांची हीच क्षमता 97 टक्के इथपर्यंत आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्यातील 578 शाळांमधील 5 हजार 308 विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासण्यात आली. त्यात 1 हजार 91 शिक्षक होते. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शब्दवाचन, ऐकून शब्द लिहिण्याची क्षमता, चित्र ओळखणे त्याचबरोबर भाषेतील कृती तयार करून अंक ओळखणे आदी चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यावरून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि संपादणुकीचा अहवाल केंद्र सरकारकडून नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने मराठी माध्यमांच्या शाळांसोबतच गुजराती, कन्नड, हिंदी, बंगाली आणि उर्दू शाळांचा समावेश होता. त्यामध्ये 113 मराठी शाळा, त्यातील 211 शिक्षक आणि 994 विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

अंकगणितातील स्थिती (टक्केवारीत)

विषय राज्य देश

अंकवाचन (9999 पर्यंत) 60 64

बेरीज 55 53

वजाबाकी 67 62

गुणाकार 71 71

भागाकार 58 49

मोजमाप करणे 61 62

वेळ ओळखणे 54 52