
दहशतवादी याकूब मेमनचे उदात्तीकरण शिवसेना कधीच करणार नाही. उलट ज्या वेळी याकूबला फाशी झाली तेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार होते. जर दहशतवादी कसाबचा मृतदेह कुटुंबीयांना दिला गेला नाही तर याकूबचा मृतदेह कसा ताब्यात दिला गेला, याची उत्तरे आधी द्या. तेव्हा आम्ही मागणी करतो की, याकूबच्या कबरीच्या सुशोभाकरणाची चौकशी करा आणि जी कारवाई करायची ती करा, पण उगाच शेपटय़ा आपटत बसू नका, असा टोला लगावताना शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आज लगावला.
बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण झाल्यावरून शिवसेनेवर आरोप करणाऱया भाजप नेत्यांना अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अरविंद सावंत म्हणाले, ‘‘खरंतर 2015मध्ये याकूबला तत्कालीन तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने फाशी दिली. तेव्हा राज्यातदेखील सरकार कोणाचं होतं, हे सर्वांना माहीत आहे. यानंतर मधल्या काळात अशी माहिती उपलब्ध आहे की, कुणीतरी त्या कब्रस्तानातील जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला. कोणी ती जागा विकत घेऊन त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी अटक केली. हीपण माहिती आमच्याकडे आहे आणि ती माहिती तपासून पाहा.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बडा कब्रस्तान ही खासगी जागा आहे. त्या खासगी जागेत काय घडतंय, याबाबत राज्य सरकार निर्णय घेत नाही. पण तरी उठसूठ महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं जातं. देशात इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी प्रश्न, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर इत्यादी सगळ्यांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सातत्याने असा अश्लाघ्य प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.
पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या नेतृत्वात चौकशी
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणा प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या नेतृत्वात चौकशी होणार आहे. एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील तपास करणार आहेत. वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडूनही याविषयी माहिती घेण्यात येत आहे.
लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही नीती – अजित पवार
कबरीचे सुशोभीकरण जर झाले असेल तर कोणीतरी लक्षात आणून द्यायला हवे होते. मी यासंबंधी माहिती घेईन. पण देशद्रोही, समजाकंटक यांचे उदात्तीकरण होता कामा नये. पण भाजपकडून सारखी जी टीका होतेय त्यावरून त्यांच्याकडे लक्ष्य करण्याशिवाय दुसरे मुद्दे नाहीत. यांना महागाई, बेरोजगारीसंबंधी बोलता येत नाही. शेतकरी हवालदिल झाला असून रोज आत्महत्या करत आहे. त्याला ताठमानेने उभं करण्यासाठी मदत करत नाही आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही नीती आहे. या गोष्टीला महत्त्व देण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
पाप लपवण्यासाठी धार्मिक राजकारण; काँग्रेसचा आरोप
काँग्रेसला बदनाम करण्याची यांची नेहमीची खेळी आहे. आम्ही अफजल गुरू, कसाबला फाशी दिली आणि जगभरात संदेश दिला. फाशी दिल्यानंतर लोकांना याबद्दल कळलं होतं. गाजावाजा होऊ न देता त्यांना दफन करण्यात आलं होतं. मग यांना याकूबचा मृतदेह देण्याची गरज काय होती? यांचं सरकार आणि गृह मंत्री होते. यांनी दफनविधी होऊ दिला आणि लोक तिथे जमू दिले. आपलं पाप लपवण्यासाठी हे धार्मिक राजकारण करत असून धर्मांधता पसरवत आहेत. यांचं पाप आहे आणि आम्हाला प्रश्न विचारत आहेत. भावनिक राजकारण करायचं, धर्मांधता पसरवायची हा यांचा धंदा आहे, असा संताप काँग्रेस प्रवत्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
























































