
ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत आणि गणरायाचा जयघोष करीत सातारावासीयांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पावसाच्या सरीवर सरी झेलत भक्तिरसात न्हालेली सातारची विसर्जन मिरवणूक जवळपास 16 तास चालली. सकाळी सव्वासात वाजता शनिवार पेठेतील मानाच्या शंकर-पार्वती-गणपती मूर्तींच्या विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.
सातारा शहरासह संपूर्ण जिह्यात गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. जिह्यात कोठेही अनुचित प्रकार घडले नाही. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासूनच शहराच्या विविध भागातून गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिकेने बुधवार नाका, गोडोली आदी ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली होती. या ठिकाणांसह कृष्णा नदीवरही विसर्जनासाठी तुडुंब गर्दी झाली होती. घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी हुतात्मा स्मारकाजवळ कृत्रिम तळ्याची व्यवस्था होती. याशिवाय फुटक्या तळ्यासह काही ठिकाणी विसर्जनासाठी भव्य कुंड ठेवण्यात आले होते. अशा ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठीही व्यवस्था केली होती.
साताऱयात विसर्जन मिरवणुकीदरम्यान सायंकाळी सातनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. अशा पावसातही पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणांसह तरुणींनींही ठेका धरलेला पाहायला मिळाला. मिरवणुकीत पाऊस असला तरी प्रचंड उत्साह होता. कोरोना विषाणूमुळे दोन वर्षे विसर्जन मिरवणूक आणि जल्लोष करायला मिळाला नव्हता; परंतु काल विसर्जन मिरवणुकीत अनेकजण बेधुंद होऊन नाचताना दिसून आले.
शहरातील मानाचे गणपती आणि सातारा शहरातील इतर भागातील गणपती राजवाडा येथील मोती चौक परिसरात आल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस पथक तैनात होते. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल स्वतः तेथे थांबून पाहणी करीत होते. पोलिसांनी रात्री बारानंतर वाद्ये वाजविण्यास पूर्णपणे बंदी
घातली होती.
फलटण शहर व ग्रामीण भागात गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ट्रक्टर ट्रॉली व अन्य वाहतूक साधनांना केळी, नारळाचे खुंट, पान-फुले, भगव्या पताकांनी आकर्षकपणे सजविण्यात आलेल्या वाहनांमध्ये गणरायांच्या मूर्ती ठेवण्यापूर्वी सामुदायिक आरती झाली. यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर करीत विसर्जनस्थळांच्या दिशेने सवाद्य गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
पाचगणीत 11 दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक बप्पाचे आज शांततेत विसर्जन सुरू होते. संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणुकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणुका चालू होत्या. टेबललँड येथील तलावावर सकाळपासूनच सर्व गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत होत्या. सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नागरिकांनी गणेश विसर्जन केले.





























































