‘नगर मर्चंट्स’ गुन्ह्याचा तपास रेंगाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर मर्चंट्स बँकेच्या 10 कोटी 25 लाख रुपये फसवणुकीचा तपास लागला नाही. पोलिसांनी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना पत्र दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून माहिती प्राप्त न झाल्याने तपास रेंगाळला आहे.

नगर मर्चंट्स बँकेच्या 10 कोटी 25 लाख रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भामध्ये बँकेने दिलेल्या फिर्यादीवरून उद्योजक साळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात पोलिसांनी दोन वर्षे तपासच केला नव्हता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या संदर्भामध्ये पत्र दिल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्यासह दोनजणांचा जबाब एमआयडीसी ठाण्याने नोंदविला होता.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठवे यांनी जिल्हा उपनिबंध कार्यालयाला पत्र देऊन नगर मर्चंट्स बँकेचे ऑडिट रिपोर्ट मागवलेले होते. मात्र, महिना उलटूनही कोणतीच कागदपत्रे पोलिसांना मिळालेली नाहीत, त्यामुळे हा तपास थंडावलाच आहे.

पुन्हा पत्र देत माहिती मागविली

आम्ही दोन्ही ठिकाणी पत्रे दिली आहेत. मात्र, आमच्या हातात कोणतीच कागदपत्रे न आल्यामुळे पुढील कारवाई करता येत नाही. आम्ही पुन्हा एकदा त्यांना पत्र देऊन याची माहिती मागवलेल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली आहे.