
>>आसावरी जोशी
आज वैशाली भेटली.. वैशाली सामंत! एक प्रसन्न व्यक्तिमत्व.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक छान.. सुज्ञ.. आणि सुरेल गायिका.. तिच्या प्रत्येक गाण्यावर ती घेत असलेली मेहनत नेहमीच जाणवते. मग ते गाणे कोणत्याही प्रकारचे असो.. वैशालीचे कष्ट आणि सुरांवर घेतलेली मेहनत लपून राहत नाही.. मग ते अगदी कितीही उडते गाणे असो..किंवा ती परीक्षक म्हणून नवोदित गायक, गायिकांच्या गायनाचे परीक्षण करीत असो.. तिच्या या भूमिकेचे मला आवर्जून कौतुक करावेसे वाटते.. परीक्षण करीत असताना ती सुरांना किती पक्की आहे.. तिचा शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिची गाण्यावर असणारी सच्ची श्रद्धा सहजच समजून येत असते.. अतिशय सकारात्मकता हा तिचा स्थायी भाव. त्यामुळे गाण्याचे प्रत्येक अंग तिला उलगडून पाहायला आवडते.. आज पुन्हा वैशालीच्या एका नव्या, छान रुपाची ओळख झाली.. आज “सांग ना…” या व्हिडीओ सॉंगची निर्माती म्हणून वैशाली प्रेक्षकांसमोर आली आहे.. अर्थात गायिका ही आपली मूळ ओळख तिने जपली आहेच.. त्या ओळखीला ती जीवापाड जपते हे मला पक्के ठाऊक आहे.. त्यामुळे गाणे हे आपले अंतरंग जपत आता तिने गाण्यांच्या निर्मिती क्षेत्रातही पाउल टाकले आहे.. आणि ते लगोलग यशस्वीही ठरले आहे. कारण तिच्या या नव्याकोऱ्या गाण्याला ६०,००० दर्शकांनी यु ट्युबवर पसंती दर्शविली आहे. हे मी तिच्याशी गप्पा मारत असतानाच आम्हाला समजले.
आज वैशालीने जो यशाचा टप्पा गाठून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे ते यश तिच्यासाठी सोपे मुळीच नव्हते. पक्की पार्लेकर असलेली वैशाली तुमच्या माझ्यासारखीच मध्यमवर्गीय. घरात कसलीही कला क्षेत्राची पार्श्वभूमी नाही. पण वैशालीला गाणे शिकवले गेले. अर्थात अभ्यासाला प्राधान्य आधीच. पण तिने दोन्हींचा समतोल उत्तम साधला. सर्वप्रथम श्रीधर फडकेंच्या कार्यक्रमात कोरस मध्ये गायला सुरुवात केली.. त्यानंतरही बऱ्याच ठिकाणी ती कोरस गायली. पण सुरेश वाडकरांना काचेपलिकडे गाताना पाहून तिनेही निश्चय केला की आपणही या काचेपलिकडेच गायला उभे राहायचे. आणि हा निश्चय तिने तंतोतंत खरा ठरविला..

आज वैशालीच्या बोलण्यात तोच आत्मविश्वास नव्याने जाणवत होता.. गाणे, खाणे आणि आता गाण्याची निर्माती या सगळ्या प्रवासाविषयी सांगताना वैशाली म्हणाली की एक कलाकार, गायिका, छोटीशी उद्योजिका म्हणून मी स्थिरावले आणि पुन्हा नव्याने स्वत:च शोध घेऊ लागले.. संगीतकार झाले.. शब्द सुचले.. आणि आता एक वेगळा प्रयत्न करून पाहायचे ठरविले.. अर्थात माझा प्रत्येक प्रयोग हा गाण्याशी निगडीतच असतो..या चलचित्र गाण्याविषयी माझ्या कल्पना डोक्यात पक्क्या होत्या. गाणे जरी ग्रामीण बाजाचे असले तरी याचे चित्रीकरण मला एकदम कॉर्पोरेट स्टाईलने हवे होते. आजची तरुण पिढी.. त्यांचे चोवीस तासातील १२ ते १५ तास ऑफिसमध्ये जात असतात. त्यामुळे ही प्रेमकथा मला याच वातावरणात फुलायला हवी होती. आणि त्यासाठी एक गोड जोडी मी दहा वर्षांपूर्वीच हेरून ठेवली होती. अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. जय महाराष्ट्र धाबा भटिंडा या चित्रपटाच्यावेळी मी त्यांना पहिले होते. आणि माझा प्रोजेक्ट नक्की झाल्यावर मी सुखदाला फोन केला. ती एक उत्कृष्ट सालसा डान्सर आहे. आणि त्याचा आम्ही इथे छान वापर करून घेतला आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण कोणत्याही स्टुडीओत झालेले नाही तर खऱ्याखुऱ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, खऱ्या ऑफिस स्टाफला बरोबर घेऊन झाले आहे. माझी मैत्रीण रसिका कुलकर्णी, हिने तिचे कॉर्पोरेट ऑफिस आम्हाला चित्रीकरणासाठी देऊन टाकले. हा सगळा वैशालीचा पहिलाच अनुभव होता आणि तो अतिशय सुंदर होता.. वैशाली सांगते मी माणसे जोडत गेले.. मला माणसे जोडायला आवडतात, आणि ती माझ्याशी जोडली जातातही.. यामुळे माझा प्रवास सुकर होतो. मिलिंद गुणाजी ते अभिजित खांडकेकर हा दोन विभिन्न पिढ्यांचा प्रवास कसा होता या प्रश्नावर वैशाली म्हणाली.. दोघांना अजिबात फरक करू शकत नाही. कारण दोघेही आपापल्या कामात अत्यंत चोख, आणि अतिशय नम्र. मला दोघांचाही अनुभव खूप गोड आणि चांगला.

वैशालीचा शास्त्रीय संगीताचा पाया अतिशय पक्का आहे. पं. मनोहर चिमोटे यांच्याकडून ती शास्त्रीय संगीत शिकली आहे. ती यात काही करणार आहे का असे विचारताच वैशाली थोडी भावूक झाली. मला म्हणाली हा प्रश्न माझ्या गुरुजींकडून आला आहे असे मी मानते. नक्कीच मी करणार आहे. मला गाण्याचे प्रत्येक रूप अनुभवायचे आहे. मला कॅब्रे गायचे आहे.. आणि नंतर शास्त्रीय संगीत मी पक्की बैठक मांडून मी करणार आहे. स्वामी समर्थांचे गाणे वैशालीने सुफी सुरावटीवर केले आहे.
आज वैशालीने यशाचा अजून एक टप्पा गाठला आहे. तिचा हा नवा आत्मविश्वास खूपच छान वाटत होता. गायिका ही ओळख जीवापाड जपत वैशालीचा प्रवास तिच्यापुर्ता छान सुरु आहे.. यातूनच तिचे आणि प्रेक्षकांचे एक सुरेल नाते जुळले आहे.. आणि हेnaate ती मन:पूर्वक भरभरून जगते आहे..
| ReplyForward |




























































