लेख – अपघातबळींचा ‘वेग’ का वाढतोय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजीव मुळय़े

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार गेल्या वर्षी हिंदुस्थानात रस्ते अपघातात एकूण 1 लाख 55 हजार 622 लोकांचा मृत्यू झाला. या अहवालात रस्ते अपघातांची दोन प्रमुख कारणे सांगितली गेली आहेत – वेग आणि बेफिकिरीने वाहन चालवणे. केंद्र आणि राज्य सरकारे रस्ते अपघात आणि वाहतुकीचे नियम याविषयी वेळोवेळी विविध माध्यमांतून जनजागृती करत आहेत. वाहतुकीचे नियमही कडक करण्यात आले आहेत. मात्र या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.

रस्त्यांवरील अपघातांशी संबंधित अलीकडच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. पहिली बातमी म्हणजे, रस्ते अपघातांशी संबंधित सरकारी अहवालानुसार, गेल्या वर्षी रस्ते अपघातात दीड लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. दुसरी बातमी म्हणजे, केरळ उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालात असे म्हटले आहे की, खड्डय़ांमुळे अपघात झाल्यास त्याला जिल्हाधिकारी जबाबदार असतील. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे जणू काही आपल्या समाजात मुरले आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, उलट दिशेने वाहन चालवणे हे प्रकार सर्रास घडतात. आपण सर्वांनी ते जणू स्वीकारलेच आहे, असे दिसते. रात्रीच्या वेळी वाहतूक नियमांना काहीच अर्थ उरत नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा नुकताच आलेला अहवाल धक्कादायक आहे. त्यानुसार गेल्या वर्षी हिंदुस्थानात रस्ते अपघातात एकूण 1 लाख 55 हजार 622 लोकांचा मृत्यू झाला. या अहवालात रस्ते अपघातांची दोन प्रमुख कारणे सांगितली गेली आहेत – वेग आणि बेफिकिरीने वाहन चालवणे. 2021 मध्ये वेगामुळे 87 हजार 50 लोक मरण पावले आणि 42 हजार 853 लोक बेफिकिरीने वाहन चालविल्यामुळे मरण पावले. दारू पिऊन गाडी चालवणे हा देशात जणू काही लोकांचा जन्मसिद्ध हक्कच बनला आहे.

गेल्या वर्षभरातील एकूण रस्ते अपघातांपैकी 1.9 टक्के अपघात दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे घडले होते. त्यामुळे 2 हजार 935 लोकांचा मृत्यू झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगात सर्वाधिक रस्ते अपघात हिंदुस्थानात होतात. त्यानंतर चीनचा आणि नंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. जीव गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांची असते.  केंद्र आणि राज्य सरकारे वेळोवेळी विविध माध्यमांतून जनजागृती करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या क्षेत्रात कौतुकास्पद काम केले आहे. केंद्र सरकारने चालकासोबत बसलेल्या व्यक्तीसाठी सीट बेल्ट आणि एअर बॅग अनिवार्य करण्यासारखे अनेक बदल केले आहेत. वाहतुकीचे नियमही कडक करण्यात आले आहेत. मात्र सर्वत्र लोक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या निष्काळजीपणामुळेच रस्ते अपघात घडतात. महाराष्ट्रातील महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणानुसार इथे होणाऱ्या अपघातांमधील मृत्यूंना अतिवेग, लेन बदलणे, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक माल अथवा प्रवासी वाहतूक ही प्रमुख कारणे आहेत. 2019 च्या तुलनेत गेल्या दीड वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण तब्बल आठ टक्क्यांनी वाढले आहे. 2019 मध्ये अतिवेगामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20045 इतकी होती आणि त्यात 8175 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये अपघातांचे प्रमाण घटून 19 हजार 419 वर आले; पण मृत्यूचा आकडा 9 हजार 152 वर पोहोचला. 2021 मध्ये अपघात आणि मृत्यू दोन्हीची संख्या वाढली आणि ती अनुक्रमे 20,860 व 9,829 वर पोहोचली. चालू वर्षी आतापर्यंत 6,448 जणांचा मृत्यू अतिवेगामुळे झाला आहे.

आता दुसऱ्या बातमीकडे वळूया. खड्डय़ांमुळे होणाऱ्या प्रत्येक अपघाताला जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांना प्रत्येक रस्त्याला भेट देण्याचे निर्देश द्यावेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. केरळमधील कोची येथे राष्ट्रीय महामार्गावर खड्डय़ांमुळे स्कूटरचालक तोल जाऊन खाली पडला आणि ट्रकने त्याला चिरडले. या घटनेवरील सुनावणीदरम्यान न्या. देवन रामचंद्रन यांनी सांगितले की, असे अपघात रोखण्यासाठी हिंदुस्थान सरकार आणि विशेषतः रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची विशेष भूमिका आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातात कोणी जखमी अथवा ठार झाल्यास तो घटनात्मक अत्याचार मानला पाहिजे. न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला आपली भूमिका मांडण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत. बहुतेक घटनांमध्ये खराब रस्त्याचे प्रमुख कारण भ्रष्टाचार किंवा निष्काळजीपणा हेच असते, असे न्यायाधीशांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या कडेला उभी केलेली वाहनेही अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरतात, हेही तुमच्या लक्षात येत असेलच. वाहन पुढे जात आहे की थांबले आहे, हे दुरून कळत नाही. हिवाळय़ात जेव्हा दृश्यमानता कमी होते, तेव्हा ही समस्या अधिक गंभीर बनते. मागून येणारे वाहन समोरच्या वाहनाच्या अगदी जवळ येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि लोकांचा नाहक बळी जातो. असे अपघात देशभरातील रस्त्यांवर घडत असतात आणि आपण या समस्येवर अद्याप तोडगा काढू शकलेलो नाही. याशिवाय अतिवेगाने वाहन चालवणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, मोटरसायकलस्वारांनी हेल्मेट न घालणे आदी कारणांमुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो. अन्य कारण म्हणजे चुकीच्या दिशेने गाडी चालविणे. ही समस्या सर्वत्र दिसते. अनेक वेळा वाहनातील प्रवाशांचा अपघातस्थळीच मृत्यू होतो.

2025 पर्यंत रस्ते अपघात आणि मृत्यू सुमारे 50 टक्क्यांनी कमी करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. तामीळनाडूने या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण तेथे कमी झाले आहे. अपघाताची नेमकी कारणे शोधणे, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 13 मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचणे, अपघातस्थळाची योग्य दुरुस्ती आणि विविध यंत्रणांमधील उत्तम समन्वय याबाबतीत तामीळनाडू मॉडेल हे देशभरात रोलमॉडेल ठरू शकते. रस्ते अपघातांमुळे एकीकडे विनाकारण जीव जातात, तर दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा दुष्परिणाम होतो, हे समजून घ्यायला हवे. रस्ते अपघात हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, ती एक सामाजिक समस्याही आहे. रस्ते अपघात टाळायचे असतील तर आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहे.)