
मुंबई विभागातील अकरावी ऑनलाइन प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने पहिल्यांदाच दैनंदिन गुणवत्ता फेरीचे आयोजन केले आहे. ही गुणवत्ता फेरी 25 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यात विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता नोंदणी करता येईल तर त्यानंतर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेता येईल. यासाठी महाविद्यालयांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अकरावीच्या 7 हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या असल्याने ही दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्यात आली आहे. ही फेरी गुणवत्तेवर आधारित असेल. निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी 10 वाजता घोषित केली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नव्याने अर्ज करावा लागेल. संध्याकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 8वा.पर्यंत दैनंदिन गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या पसंतीच्या अर्जामध्ये किमान 1 आणि कमाल 10 विद्यालयांची नोंदणी करता येईल. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्याना दुसऱया दिवशीच्या गुणवत्ता यादीसाठी वरील वेळेत दररोज अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्याची पसंती फक्त त्या दिवसासाठी वैध राहील. दिलेल्या वेळेत विद्यार्थ्याला दररोज त्याचा अर्ज पुन्हा लॉक करावा लागेल. सकाळी 10 ते 5वाजेपर्यंत विद्यार्थी निवडलेल्या विद्यालयात त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील वेळोवेळी सुधारित होईल. पुढील अर्ज भरण्यापूर्वी रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांना तपासावा लागेल. भाग-2 मध्ये एकदा नोंदणी केल्यानंतर तो अनलॉक करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावेळी प्रवेश घेताना अत्यंत खबरदारीने प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सहजपणे प्रवेश घ्यावा यासाठी यावेळी विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यालयाच्या यादीतील स्थिती निवड किंवा प्रतीक्षा क्रमांक विद्यार्थ्यांना दाखवला जाईल. त्यामुळे गुणवत्ता आणि प्रवेश यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्नही या निमित्ताने होणार आहे.
प्रवेश घेणे बंधनकारक
विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आपला ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्यामध्ये भाग-1 आणि भाग-2 ही भरता येतील.
मात्र मिळालेले प्रवेश रद्द करता येणार नाही. त्यामुळे या दैनंदिन प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे.






















































