गुजरातमध्ये ‘आप’; आयबीचा रिपोर्ट केजरीवाल यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात निवडणुकीबाबत कुठल्याही संस्थेने कसलाही अहवाल देऊ दे, पण गुजरातेत ‘आप’चे सरकार येणार, असा रिपोर्ट आयबीने पेंद्र सरकारला दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

गुजरात दौऱयावर असलेल्या केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत ‘आप’च्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.आपचे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे आहोत. यामुळे हे अंतर वाढविण्यासाठी गुजरातच्या लोकांनी भाजपला एक मोठा धक्का द्यावा लागणार आहे. यामुळे आपला मोठे बहुमत मिळेल आणि सरकार बनेल, असे केजरीवाल म्हणाले. जेव्हापासून हा आयबीचा रिपोर्ट आला आहे तेव्हापासून भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ते गुप्त बैठका घेत आहेत. भाजप या अहवालामुळे घाबरला आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपविरोधी मतांचे विभाजन व्हावे यासाठी हा पक्ष काँग्रेसला बळकट करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

बाटली भिरकावली

केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जुनागढच्या खोडलधाम येथील गरबा कार्यक्रमाला शनिवारी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यावर गर्दीमधून बाटली भिरकावण्यात आली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाटली कोणी फेकली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.