इतके घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते, आदित्य ठाकरे यांनी खोकासुरांवर डागली तोफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘खोके सरकारमधील गद्दारांच्या गटाने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. गद्दारांकडून अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. इतके घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने आणि देशाने याआधी कधीही पाहिलेले नाही’, अशा शब्दांत आज शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या वरळी मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केले. ‘निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित नव्हता पण आता निर्णय आला आहे. त्यामुळे त्याला सामोरे जायचे आहे. लढायचे, जिंकायचे आणि पुढे जायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

…तर घटनाच धोक्यात येईल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 गद्दारांना सगळे काही दिले. यांना स्वतःची ओळख नाही आणि आता माझ्या आजोबांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. पण जनता गद्दारांना स्वीकारणार नाही, असे आदित्य म्हणाले. पाठीत वार कसले करता, हिंमत असेल तर समोरून वार करून दाखवा. आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हानच आदित्य यांनी दिले. राज्यातले सरकार घटनाबाह्य आहे. देशात अशाप्रकारे सरकारे येणार असतील तर त्याने घटनेलाच धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

जनता भक्कमपणाने शिवसेनेच्या पाठीशी

खोके सरकारने स्वतःला विकले आहे. गेल्या काही दिवसांतील दोन-तीन नेत्यांची विधाने पाहता शिवसेना संपवण्याचे कारस्थान गेल्या अडीच वर्षांपासून सुरू होते, हे उघड झाले आहे. गद्दार त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. त्याचा आसुरी आनंद त्यांना होत आहे. मात्र, महाराष्ट्रातील आणि देशातील जनता भक्कमपणाने शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे आणि हीच जनता खोकासुरांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे आदित्य यांनी निक्षून सांगितले.