
>> आसावरी जोशी
गेल्या अनेक वर्षांपासून तो संपूर्ण जग जिंकत चालला आहे.. नि:शब्दपणे!! थांबणे ठाऊकच नाहीये त्याला.. तो एक अभिनेता आहे.. लोकांच्या मनोरंजनासाठी तो बेमालूम आभासी जग उभे करतो.. प्रेक्षकांची वास्तवात पुरी न होणारी स्वप्नं मोठ्या पडद्यावर त्याच्या वावरण्याने चुटकीसरशी पुरी होतात.. तो अजूनही Angry Young Man च आहे.. वयाच्या ८० व्या वर्षीही.. आणि असंख्य तरुणांमध्ये अन्यायाविरुद्धचा आंतरवन्ही तो पेटता ठेवतो.. तो आता त्याच्या वयाला साजेशा भूमिका निवडतो.. आणि नवतरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो.. केवळ आपल्या भूमिकांमधूनच नव्हे तर त्याच्या प्रत्यक्ष कृतीतूनही.. गेल्या अनेक दशकांपासून ते आजतागायत तो चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा “नायक” आहे.. असे एकही माध्यम नाही जिथे त्याचा वावर नाही.. अत्यंत वेगवान.. आणि सतत नवनव्या घडामोडी घडत असलेले.. नवनवे चेहरे देत असलेले जाहिरात क्षेत्रही त्याने कधीच पादाक्रांत केले आहे.. लेखाच्या सुरुवातीला त्यांचा उल्लेख मी जाणीवपूर्वक एकेरी केला आहे.. कारण नायक हा नेहमी आपल्या मनाच्याजवळ असतो.. आणि एकेरी उल्लेखात एक अकृत्रिम जिव्हाळा जाणवतो.. पण तरीही त्यांच्या आभाळभर कर्तृत्वाचा.. वयाचा.. मानाचा मान राखून संपूर्ण लेखात त्यांचा उल्लेख मी बहुमानार्थी करणार आहे. मध्यंतरी बिग बींना केबीसीमध्ये विचारले गेले की तुम्ही जाहिराती का करता ..? तेव्हा हळूच डोळे मिचकावत मिश्किलपणे ते म्हणाले, क्या करे भाई.. रोजी रोटी है.. करना पडता है.. पुढे बिग बी सांगतात की भरपूर जाहिराती मिळत असल्याने आता चित्रपटांच्या बाबतीत मात्र चोखंदळ झाले आहेत. वर्षाकाठी एखादाच पण मनाला भावलेला चित्रपट करतात..
आज वयाच्या ८० व्या वर्षीही महानायक अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रम पाळतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही हटके गोष्टी..

१) ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्यामुळे अमिताभ अभिनयक्षेत्रात आले. खरेपाहता त्यांना इंजिनिअर व्हायचे होते. किंवा वायूदलात भरती व्हायचे होते. सुरुवातीला अमिताभनी जाहिरातींच्या जिंगल्ससाठी आपला आवाज दिला. त्यासाठी प्रत्येक जिंगलमागे त्यांना ५० रुपये मिळायचे. पण रेडीओ सिलोनवर अमीन सायानींनी त्यांचा आवाज नाकारला होता. यावर अमीनजी हसत हसत म्हणतात की जे होते ते चांगल्यासाठीच.. मी जर बीग बींचा आवाज नाकारला नसता तर चित्रपट सृष्टीला महानायक कसे मिळाले असते..
2) १९७० मध्ये आलेल्या “Bombay Talkies” या चित्रपटात अमिताभ एक्स्ट्राज मध्ये दिसले होते. आणि मुख्य भूमिकेत होते शशी कपूर. . आणि पुढे मात्र बिग बींच्या बहुसंख्य चित्रपटात शशी कपूर सहकलाकाराच्या भूमिकेत दिसले. सात हिंदुस्थानी हा त्यांचा एकमेव कृष्णधवल चित्रपट. चित्रपट सृष्टीत सुरुवातीच्या काळात त्यांना मदतीचा हात मिळाला विनोदाचे बादशाह मेहमूदकडून.. यांच्यामुळेच त्यांना “बॉम्बे टू गोवा” हा चित्रपट मिळाला. ऋषिकेश मुखर्जींच्या आनंद चित्रपटाने खऱ्या अर्थाने अमिताभ प्रेक्षकांसमोर आले.. आणि मग त्यांनी मागे वळून कधी पहिलेच नाही.. राजेश खन्ना सारख्या सुपर स्टारला त्यांनी आपल्या अबोल, संयत अभिनयाने सहज मागे टाकले.. या सर्वांमध्ये त्यांना मेहमूद यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि साथ लाभली.
३) अमिताभनी आजवर अनेक नायिकांसोबत काम केले. पण त्यांची आवडती अभिनेत्री वहिदा रेहमान. त्यांच्यामते वहिदाजी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर नायिका आहेत. कभी कभी या एकमेव चित्रपटात अमिताभ यांनी आपल्या आई वडिलांसमवेत काम केले.मी. नटवरलाल हा चित्रपट त्यावेळचा ठकसेन मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल याच्यावर आधारलेला होता. या चित्रपटातून नायक आणि गायक या दोन्ही भूमिका अमिताभनी निभावल्या. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार त्यांचे प्रेरणास्थान. त्यांच्या black चित्रपटाने तब्बल ११ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. हा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेले नाही.. याखेरीज त्यांचा अजून एक विक्रम म्हणजे सर्वाधिक दुहेरी भूमिका त्यांनी केल्या आहेत.

४) कौन बनेगा करोडपती हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा.त्यांच्या पडत्या काळात या कार्यक्रमाने त्यांना हात दिला. आणि हे ते कधीही विसरत नाहीत. जेव्हा अमिताभ यांच्या हातात एकही चित्रपट नव्हता तेव्हा ते यश चोप्रांकडे काम मागायला गेले. केवळ अमितजींसाठी यश चोप्रांनी मोहबतेची निर्मिती केली. आणि त्यांना मानधनाचा आकडा विचारला. त्यावर अमितजींनी नम्रपणे सांगितले, मी आज तुमच्यापुढे याचक म्हणून उभा आहे.. तेव्हा तुम्ही जे मानधन द्याल ते मी स्वीकारेन.
५) अमिताभ बच्चन आणि केबीसीचे नाते २० वर्षे जुने आहे.सुरुवातीला ते या कार्यक्रमाचे मानधन २५ लाख घेत असत. आता ते वाढून ३ कोटींवर गेले आहे. अजूनही ते कार्यक्रमाच्या नियोजित वेळेआधी २ तास चित्रीकरणासाठी पोहोचतात. उमेदवाराची सगळी माहिती काढून घेऊन त्यांचा अभ्यास करतात. अमिताभनाही प्रश्नांची उत्तरे उमेदवाराबरोबर कॉम्प्यूटरवरच दिसतात. आधी समजत नाहीत. बिग बींच्या कपड्यांवर, पेहरावावर दहा लाख रुपये खर्च होतात.

६) आजही बिग बी त्यांच्या एका चित्रपटाचे सर्वाधिक म्हणजे २० कोटी मानधन घेतात. त्यांचे मुंबईत पाच आलिशान बंगले आहेत. प्रत्येक बंगल्याची किमत २०० कोटीहून अधिक आहे. त्यांचा जलसा बंगला दिग्दर्शक रमेश सिप्पींकडून त्यांना भेटीदाखल मिळाला आहे.
७) बिग बींचा आवडता छंद म्हणजे उत्तमोत्तम लेखण्या जमा करणे. त्यांच्याकडे दुर्मिळ ते आधुनिक पेन्सचा संग्रह आहे. त्यांच्याकडे एकूण १५ गाड्या आहेत. त्यामध्ये रोल्स रॉइस, बेन्टले, पोर्शे अशा आलिशान गाड्या आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार अमिताभ यांची एकूण संपत्ती २८०० कोटी इतकी आहे. कपड्यांमध्ये त्यांचा सर्वात आवडता ब्रान्ड गब्बाना आहे.
८) शुद्ध शाकाहारी असलेले अमितजी नेहमी स्वत:चा स्वयंपाकी बरोबर बाळगतात. बाहेरचे पाणीही पीत नाहीत. भेंडीची भाजी, दाल, चावल हा त्यांचा आवडता आहार. दररोज पहाटे ५ किलोमीटर धावायला जातात. मद्यपान, धुम्रपान अशा व्यसनांपासून ते नेहमीच दूर राहतात.
आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना अनेक शुभेच्छा.























































