खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सावकाराने संबंधिताकडून 8 लाखांच्या बदल्यात 19 लाख वसूल केल्यानंतरही आणखी 15 लाखांची मागणी केली होती. रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिल्यामुळे तरूण घरातून निघून गेला आहे.
याप्रकरणी खासगी सावकार पराग गायकवाड (वय 40, लक्ष्मी नगर, पर्वती) याला अटक करण्यात आली आहे. अमोल इचगे (33) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती अमोल व्यावसायिक असून त्यांनी 2017 साली परागकडून 12 ते 15 टक्के व्याजाने 8 लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात वेळोवेळी 19 लाख रुपये माघारी दिले होते. मात्र, तरीही पराग त्यांच्याकडे 15 लाखांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास धमकी देत होता. त्यामुळे मानसिक तणावातून अमोलने घर सोडले. सावकार परागच्या धमकीला कंटाळून अमोल 8 ऑक्टोबरपासून घर सोडून निघून गेला आहे, असा आरोप महिलेने केला आहे.
खासगी सावकारीतून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.
– धीरज गुप्ता, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे


























































