
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या बीड जिल्ह्यात निसर्गाचा प्रकोप मात्र सुरूच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे नित्याचेच. यंदा मात्र यापेक्षा भयंकर परिस्थितीचा सामना बीड जिल्ह्याला करावा लागत आहे. एकाच हंगामात आलेले तीन संकट सर्व काही घेऊन गेले आहे. परतीच्या पावसाने हातात आलेला घास हिरावून घेतला.
यंदा शेती शेतकऱ्यांसाठी आत-बट्याचा व्यवसाय ठरली. वर्षभर राबूनही हातात तर दमडी पडणारच नाही. झालेला खर्च कोठून काढायचा या चिंतेत पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. खरीप हंगामाला मोठा तडाखा बसला आहे, पन्नास टक्के कापूस अन् सत्तर टक्के सोयाबीन पाण्यात आहे. भर दिवाळीत शिमगा करण्याची वेळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. तब्बल दीड लाख हेक्टर वरील सोयाबीन अन् एक लाख हेक्टरवरील कापूस उद्धवस्थ झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकाच हंगामात आधी अतिवृष्टी मग दिलेली उघडीप आणि परतीच्या पावसाचा हाहाकार या संकटाने बीड जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. काढणीला आलेले सोयाबीन सध्या पाण्यात आहे. तर बोंड आलेले कापूस सडत आहेत. दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि एक लाख हेक्टरवरील कापूस निसर्गाने उद्धवस्त केले आहे. खरिप हंगाम यंदा बहरेल या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. बीड जिल्ह्यातील परळी, केज, माजलगाव, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर, गेवराई या तालुक्यामध्ये झालेल्या धुवॉधार पावसाने अक्षरश: सोयाबीनच्या घुगऱ्या आणि कापसाच्या वाती झाल्या आहेत. जमिनीलगत असलेले कापसाचे बोंडे सडून गेली आहेत. तर सोयाबीनला कोंबे फुटली आहेत. शेतात काढून ठेवलेले सोयाबिनचे ढिगारे नदी-नाल्यातून तलावापर्यंत पोहचले आहे. नुकसान झालेला शेतकरी आता चिंतेत आहे. भर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर यंदा शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण एकरी सोयाबिनचा खर्च वीस हजाराच्या घरात आहे. तर एकरी कापसाचा खर्च सोळा हजाराच्या घरात आहे. पदरात मात्र काहीच नाही. देणी कशी फेडायची आणि पुढच्या वर्षी काय खायचे ही चिंता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.
विमा कंपन्यांची नौटंकी, शेतकऱ्यांमध्ये संताप
परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. शेती खरडून गेली. पावसाचे पाणी अजूनही शेतात दडून बसले आहे. एवढे प्रचंड नुकसान होऊनही सरकार आणि प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कागदी घोडे नाचवत आहेत. विमा कंपन्या नुकसानीचा पुरावा मागत आहे. झालेल्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो डाऊनलोड करण्याच्या सूचना देत आहेत. शेतकरी चिखल तुडवत झालेल्या नुकसानीचे फोटो काढण्यासाठी शेतात जात आहे. मात्र याचवेळी विमा कंपन्यांचे सव्र्हेर डाऊन होत आहे. त्यापेक्षा संताप आणणारी बाब ही आहे की, जून-जुलै महिन्यात शिवार पीक पेरणी मोजली जात असे. ती पद्धत यावर्षी बंद झाली आहे. जेव्हा प्रचंड नुकसान झाले तेव्हा महसूल प्रशासनाने फतवा काढून शेतकऱ्यांनी पिक पेरणीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून पाठवायचे सांगितले आहे. ते ही ऑक्टोबर महिन्यात. आज पीक पेरणी देण्याचा शेवटचा दिवस आहे. शेतकरी संकटात असताना ऑनलाईन फॉर्म भरण्यात आणि फोटो काढण्यातच व्यस्त आहे. मदत देणे लांबच राहिले पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची छळ छावणी मांडली आहे. पिकविम्याच्या नौटंकीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एकरी सोयाबिनचा झालेला खर्च
बियाणे- एक बॅग 4000 हजार रूपये
पेरणी- 500 रूपये
मशागत – 3000 हजार रूपये
फवारणी – 4000 हजार रूपये
काढणी- 5000 हजार रूपये
खत-2000 हजार रूपये
खुरपणी-2000 हजार रूपये
एकुणच खर्च-20 ते 22 हजार रूपये
कापसाचा एकरी खर्च
एकरी कापूस बियाण्यांच्या दोन बॅग-1600 रूपये
लागवड खर्च – 1500 हजार रूपये
खताचे तीन डोस- 6000 हजार रूपये
औषध फवारणी 4 वेळा-5000 हजार रूपये
दोन ते तीन पाळ्या -1500 हजार रूपये
एकुण खर्च-16 ते 18 हजार रूपये



























































