
बिग मी इंडिया कंपनीच्या फसवणूक प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कंपनीच्या सीईओ वंदना पालवे व शॉलमान गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. संपूर्ण राज्यातून साडेसात कोटींपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या बिग मी इंडिया कंपनीविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कंपनीचा संचालक सोमनाथ राऊत व त्याच्या सहकाऱ्यांनी ऑनलाइन स्वरूपात मोठी गुंतवणूक केली होती. थोडे दिवस परतावा रक्कम परत देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून अधिक गुंतवणूक करून घेतली होती. मुख्य आरोपी सोमनाथ राऊत, आरोपी सोनिया राऊत हे मोठी रक्कम हडप करून फरार झाले होते. इतर आरोपींनी कंपनीतील कागदपत्रे नष्ट करणे, पैसे स्वतःच्या खात्यावर ठेवून लपविणे, असे वेगवेगळ्या पद्धतीने गंभीर गुन्हा केले होते.
आरोपी वंदना पालवे व शॉलमान गायकवाड यांनी पुरवणी दोषरोपानंतर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपींच्या वतीने ऍड. गुगळे व ऍड. पालवे यांनी जामीन अर्ज मंजूर व्हावा, यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील ए. बी. पवार यांनी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी जामीन अर्जासाठी विरोध केला. मुख्य फिर्यादी सतीश खोडवे, साक्षीदार उदय जोशीलकर, रोनक शहा, मारुती गडदे, दिनकर केदार, तेजस भस्मे, सुकुमार खवाटे यांनी लेखी म्हणणे मांडून जामीन अर्जासाठी विरोध केला होता. अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.
न्यायालयाच्या आवारात फिर्यादीला धक्काबुक्की
– फिर्यादी सतीश खोडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी साधारण 1200 पानांचे पुरावे, कॉल रेकार्ंडग, जाहिरात पुरावे, बँक खाते उतारे, संगतमत केलेले पुरावे, खोटी कागदपत्रे तयार केलेले पुरावे, करार, पावती, पत्रव्यवहार इत्यादी पुरावे पोलीस तपासात जमा केले आहेत. आरोपी वंदना पालवे ही कंपनीच्या सीईओ पदावर मागील 5 ते 6 वर्षे काम करीत होती. आरोपी पालवे हिचे वडील व भावाने कोर्टाच्या आवारात मुख्य फिर्यादी सतीश खोडवे यांना धक्काबुकी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल केला आहे.

























































