वेब न्यूज – मुके लागले बोलावया…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

पृथ्वीवरील  अनेक सजीव हे आवाजाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असतात. अनेक प्राणी आवाजांद्वारे परस्पर संवाद साधतात. जनावरांच्या या परस्पर संवादांचा अभ्यास करत असताना नुकताच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आजवर मुके समजले जाणारे 50 प्राणी हे प्रत्यक्षात संवाद साधू शकतात असे उघड झाले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स जर्नल’मध्ये जीवशास्त्र्ाज्ञ गॅब्रिएल जॉर्जविच-कोहेन यांचे यासंदर्भातील संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या मूक मानल्या गेलेल्या प्रजातींचे पूर्वज 40 दशलक्ष वर्षांपूर्वी संवाद साधू शकत होते. हीच संवाद साधण्याची क्षमता सध्याच्या या जिवांनी विकसित केली आहे. अॅमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये कासवावर संशोधन करत असताना गॅब्रिएल जॉर्जविच-कोहेन यांना प्रथम ही संवादाची कल्पना सुचली आणि त्यांनी या मूक प्रजाती संवाद साधतात का? साधत असतील तर ते आवाज रेकॉर्ड करता येतात का, ते शोधण्याचे ठरवले.

या संशोधनासाठी त्यांनी त्यांचे पाळीव कासव ‘होमर’ याच्यावर प्रयोगास सुरुवात केली. जमिनीवर आवाज रेकॉर्ड करण्यासाठी हायड्रोफोन्स आणि पाण्याखाली मायक्रोफोन्सचा वापर करण्यात आला. त्यावेळी होमर आवाज करत असल्याचे सिद्ध झाले. या प्रयोगाच्या यशानंतर इतरही सरपटणाऱ्या जिवांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये लंगफिश, सापासारखी दिसणारी सिसिलियन प्रजाती, न्यूझीलंडमध्ये आढळणारा दुर्मिळ टय़ुएटरा इत्यादींचा समावेश करण्यात आला.

संशोधनात हे सर्व सजीव किलबिलाट, गोंगाट करणारे आवाज काढतात असे सिद्ध झाले. अर्थात हे आवाज अत्यंत हळू असतात आणि हे सजीव दिवसातून काही वेळा किंवा कधी कधी एकदाच आवाज काढतात असेदेखील संशोधनात आढळून आले आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, केवळ पृष्ठवंशी प्राणीच नाही तर अनेक प्रजाती ज्यांना मुके म्हणून ओळखले जाते त्यांच्याकडे ध्वनी निर्मितीची क्षमता आहे.