
कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सातारा-मेढा रस्त्यावरील चिंचणी येथे घडली आहे. या अपघातात कारमधील बालकासह पाचजण जखमी झाले आहेत.
भरत यदू शेलार (वय 48, रा. थोरली काळोशी, ता. जावळी) व रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय 54, रा. मेढा, ता. जावळी) अशी मृतांची नावे आहेत.
चारचाकी गाडी मेढय़ाहून सातारकडे येत होती. यावेळी चिंचणीनजीक गाडीचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडीने समोरून येणाऱया दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दोन्ही वाहने नाल्यामध्ये कोसळली. यात दुचाकीवरील शेलार व चिकणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील एक 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, इतर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटनास्थळी भेट दिली.




























































