नेवाशातील तरुणाने स्वतः चिता रचून केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा तालुक्यातील चांदा येथील तरुणाने शेतात स्वतः चिता रचून पेटवून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. शनिवारी (दि. 29) ही घटना घडली. अनिल साहेबराव पुंड (वय 27, रा. चांदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

चांदाजवळील लोहरवाडी वस्ती येथे साहेबराव पुंड हे कुटुंबासह राहतात. शनिवारी मध्यरात्री त्यांचा मुलगा अनिल याने घरापासून जवळ असलेल्या आपल्या शेतात ठिबक सिंचनच्या नळ्या गोळा करून त्या अंथरल्या. तारेच्या साहाय्याने त्या बांधून पेटवून घेत आत्महत्या केली. यावेळी त्याचे आई-वडील बाहेर गेले होते.

श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली. अनिल याने आत्महत्या करताना चिठ्ठी लिहून ठेवली असून, आत्महत्येला स्वतःच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तपास करीत आहेत.