
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
लग्नानंतर मुलीचे माहेर तुटणे आणि कित्येक वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतर ऑफिसशी संबंध सुटणे, हे दोन्ही प्रसंग हेलावून टाकणारे असतात. जिथे खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, आई, वडील, भावंडे या जिव्हाळय़ाच्या नात्यांवर पाणी सोडून सर्वस्वी नवीन घरात प्रवेश करण्यासाठी निघालेली नववधू आणि जिथे दीर्घकाळ श्रम केले, माणसे जोडली, जिच्या जिवावर समाजात प्रतिष्ठा मिळवली, प्रपंच उभा केला त्या कर्मभूमीला पारखे होणारा कर्मचारी यांच्या भावना सारख्याच व्याकुळ पातळीवर गेलेल्या असतात. पुढचे आयुष्य कसे असेल याची उत्पंठा सारखीच असते. नोकरी पेशातल्या व्यक्ती ‘कधी या कटकटीतून मोकळा होतो कुणास ठाऊक’ असे हजार वेळा मनाशी बोलत असतात. ‘अहो! नशिबाचे फासे उलटे पडले म्हणून मी या रुक्ष वातावरणात येऊन पडलो, नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो! या आठ नऊ तासांच्या फेऱयात अडकलो म्हणून माझ्यातल्या कलागुणांना न्याय मिळू शकला नाही!’ हे वाक्य नव्वद टक्के लोकांच्या तोंडात बसलेले असते, पण हेच रुक्ष वातावरण कायमचे दुरावायची वेळ येते, तेव्हा एकेकाळी रुक्ष वाटणारे भोवताल किती सुंदर, आपल्याला सांभाळून घेणारे होते याची तीव्र जाणीव होऊन जाते, पण वेळ गेलेली असते!
प्रातिनिधिक स्वरूपातली ही कहाणी –
माझे एक ज्येष्ठ स्नेही टाकळकर रिटायर झाले. एका सरकारी कार्यालयात बेरीज-वजाबाक्या करण्यात आयुष्य गेलेले. जुन्या काळच्या मॅट्रिक झालेल्या टाकळकरांना त्या काळी अगदी सहज ही कारकुनाची नोकरी मिळून गेली होती.
‘खरं सांगू का? चपराशी होता होता कारकून झालो बघा! गणेशाची कृपा!’ एकदा त्यांनी माझ्याकडे नकळत मन मोकळे केले होते. ते राहायचे परभणीला आणि पोस्टिंग नांदेडला असल्यामुळे रोज अप-डाऊन करायचे. सकाळची आठची ट्रेन असायची. ते दोन वेळचा डबा घेऊन निघायचे. गाडी व्हाया गंगाखेड यायची. त्या गाडीतून गंगाखेडचे दहिवाले उतरायचे. बॅगेतून ग्लास काढून त्यात ते पाच रुपयांचे दही घ्यायचे. तो ग्लास सांभाळून धरत ते गाडीत चढायचे. त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे सहकारी तिथे जागा धरून बसलेले असायचे. नऊ-साडेनऊला गाडी पुण्याला पोचायची. तिथे सगळय़ांचे डबे उघडले जायचे! सकाळचे जेवण तिथे उरकले जायचे. भरल्या पोटांनी नांदेड गाठायचे, मग ऑफिस रुटीन सुरू व्हायचे. दुपारी भूक लागलेली असायचीच! पुन्हा डबे उघडले जायचे! ही डबापार्टी अव्याहत पंधरा वर्षे चाललेली आणि टाकळकर यथावकाश सेवानिवृत्त झाले!
‘सुटलो एकदाचा!’ ते आनंदून गेले होते.
आता टाकळकर सकाळ, संध्याकाळ भेटू लागले. असेच काही दिवस गेले. नंतर माझ्या लक्षात येऊ लागले की, त्यांचे काहीतरी बिनसलंय. असेल काही घरगुती समस्या! मीही ते विसरून गेलो. एके दिवशी मी रेल्वे स्टेशनवरच्या बुक स्टॉलवर साप्ताहिके घ्यायला म्हणून गेलो होतो. वेळ सकाळची होती. कुठली तरी गाडी येत असल्याची घोषणा झाली होती. मी माझ्याच नादात होतो. गाडी आली आणि स्टेशन जागे झाले. चहावाले, समोसेवाले, माइकवरच्या उद्घोषणा या साऱया उद्रेकामध्ये एक चिरका ओळखीचा आवाज माझ्या कानांनी टिपला. मी चमकून पाहिले. शंकाच नको, ते टाकळकरच होते! तशीच बॅग, तोच जेवणाचा डबा, तोच दह्याचा ग्लास हातात सांभाळत गाडीत चढताना दिसले! तेवढय़ात गाडी सुटलीदेखील!
संध्याकाळी जेवणे झाली आणि अपेक्षेप्रमाणे टाकळकर डुलतडुलत आले. चेहऱयावर शांत, तृप्त भाव!
‘काय टाकळकर, एक्स्टेंशन मिळाले की काय?’
‘म्हंजे?’
‘सकाळी तुम्हाला स्टेशनवर पाहिले मी तुम्हाला!’
लहान मुलाची खोडी पकडल्यावर त्याची जशी गोरीमुरी अवस्था होते तसे ते गोंधळले.
‘खरं सांगू का?’
‘सांगा की, बिनधास्त!’
‘रिटायर झाल्यावर पहिले काही दिवस बरे वाटले बघा, पण या रुटीनची इतकी सवय झाली होती की चैनच पडेना!’
‘मग?’
‘मग ठरवले, एरव्ही मी आता रिकामाच आहे. एके दिवशी बायकोला विश्वासात घेतले. तिला माझी अडचण सांगितली. तिलाही ती पटली!’
‘मग?’
‘आता मी पूर्वी करत होतो तसंच करतो. बॅग, जेवणाचा दोन वेळेचा डबा, दह्याचा ग्लास! पुन्हा नांदेड!’
‘तिथे काय करता?’ माझी उत्सुकता शिगेला पोचली होती.
‘तिथे मला काहीच काम नसते. दुपारची वाट पाहत बसतो. तेव्हा दुपारचे जेवण होते. गप्पाटप्पा होतात आणि संध्याकाळच्या गाडीने सगळय़ांबरोबर परत!’
‘टाकळकर, तुम्ही तर या रुटीनला पंटाळला होता ना?’
माझ्या या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नसले तरी त्यांच्या पाणावलेल्या डोळय़ांनी देऊन टाकले होते.





























































