
कर्नाटक येथील बेंगळुरूमध्ये एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. शिक्षिकेने तिला उभे राहण्याची शिक्षा केली होती. पण, ही शिक्षा सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना बेंगळुरूच्या गंगम्मागुडी परिसरात ही घटना घडली आहे. येथील एका खासगी शाळेतील प्राथमिक विभागात शिकणाऱ्या निशिता नावाची ही मुलगी शिकत होती. शुक्रवारी शिक्षिकेने काही कारणाने निशिताच्या संपूर्ण वर्गाला उभं राहण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा सुरू असताना निशिताला अचानक चक्कर आली आणि ती खाली पडली.
त्यामुळे तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. निशिताच्या मृत्युची नोंद अनैसर्गिक अशी करण्यात आली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालात मुलीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळलेल्या नाहीत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































