मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा! उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आता मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.

शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे आपल्याला आतापासूनच तयार राहायला हवे. राज्यात आपली सत्ता असताना केलेले काम घराघरात पोहोचवा आणि निवडणुकांच्या कामाला लागा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात याकडेही उद्धव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान लक्ष वेधले, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.