बेकायदा सिलिंडर साठा करणाऱया गोदामांची झाडाझडती, अग्निशमन दलाने दोन वर्षांत केले 763 सिलिंडर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर पश्चिम येथील छबिलदास हायस्कूलमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आता मुंबई अग्निशमन दलाकडून सिलिंडर्सचा अनधिकृत साठा करणाऱया गोदामांची झाडाझडती केली जाणार आहे. दरम्यान, 2020-22 या दोन वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने 763 बेकायदा सिलिंडर जप्त केले आहेत.

मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमधील छबिलदास हायस्कूलच्या गच्चीतील हॉलमध्ये पहाटे झालेल्या स्फोटामुळे मुंबई ऐन दिवाळीत हादरली, मात्र शाळेला सुट्टी असल्याने मोठा धोका टळला. हॉलमधील किचनमध्ये हा स्फोट झाला. त्यामुळे बेकायदेशीरपणे सिलिंडर्सचा साठा करण्याला आळा घालण्यासाठी आणि दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरातील गोदामांची, हॉटेलची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या 24 वॉर्डांत मुंबई अग्निशमन दल आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून लवकरच विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.