
मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) सर्वसामान्यांच्या प्रवेशावर नव्या सरकारने निर्बंध आणले आहेत. दुपारी तीनपूर्वी कोणत्याही व्हिजिटर्सना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी 3 ते 5 याच वेळेत सर्वसामान्यांचे म्हणणे सरकारदरबारी मांडावे लागणार आहे. मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सर्वसामान्यांवर वेळेचे निर्बंध घालण्यात आल्याचे सांगण्यात येते.
राज्यात नवीन सरकार आल्यापासून मंत्रालयात व्हिजिटर्सची प्रचंड गर्दी वाढली आहे. जिल्हापातळीवर सर्वसामान्यांची कामेच होत नाहीत. नव्या सरकारने पालकमंत्री विलंबाने नियुक्त केले. तरीही सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे लहान-लहान कामांसाठी सर्वसामान्यांना मंत्रालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. मंत्रालयात खास करून सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात अनिर्बंध गर्दी वाढली आहे. त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्री आले तर त्यांचा निम्मा वेळ सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकण्यात जातो. परिणामी प्रशासकीय बैठकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेशावर निर्बंध आणले आहेत. सर्वसामान्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश दिला जात नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील एक अधिकारी व्हिजिटर्सच्या दालनात बसून तक्रारी घेत आहे. मात्र आता तर प्रवेशावर वेळेचे निर्बंध घातले आहेत. मंत्रालयात सर्वसामान्यांना दुपारी दोननंतर प्रवेश दिला जातो; पण आता सीएमओमध्ये दुपारी तीनच्यापूर्वी प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचना जारी केल्या आहेत. वेळेच्या निर्बंधांमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे सर्वसामान्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ग्रामीण भागातून कामांसाठी मुंबईत येतो. तीनच्यानंतर प्रवेश दिला तर आम्हाला गावी जाण्यासाठी पुन्हा गाडी पकडायची असते. त्यामुळे दोन तासांत आमचे काम आटोपले नाही तर आम्हाला मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येईल अशी भीती एकाने व्यक्त केली.



























































