संतोषकुमार घोष क्रिकेट स्पर्धा – वेंगसरकर अकादमीच्या दृष्टिपथात विजेतेपद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डावखुरा स्पिनर निकष नेरुरकर (29/6) आणि ऑफस्पिनर अनिश तांबे (31/4) यांनी स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबला 40.5 षटकांत अवघ्या 109 धावांत गुडाळल्यानंतर ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने दिवसअखेरीस 42 षटकांत 1 बाद 174 धावा फटकावत संतोषकुमार घोष (16 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर मजबूत पकड घेतली. शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळल्या जात असणाऱ्या सामन्यामध्ये ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर अकादमीच्या अथर्व दौंड (नाबाद 92) आणि आर्यन पुंजा (नाबाद 62) यांनी मनमुराद फटकेबाजी करून दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची अभेद्य भागीदारी रचली. दौंडने 138 चेंडूंचा मुकाबला करत शतकाच्या समीप जाताना 14 चौकार ठोकले.

स्पार्ंटग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुंबई क्रिकेटचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्योजक अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, माजी सचिव संजीव नाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब 40.5 षटकांत 109 (श्रेयश लाड 23, अनुज कोरे नाबाद 33, अनिश तांबे 31 धावांत 4 बळी, निकष नेरुरकर 29 धावांत 6 बळी) विरुद्ध ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर अकादमी 42 षटकांत 1 बाद 174 (अथर्व दौंड खेळत आहे 92, आर्यन पुंजा खेळत आहे 62).