मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून नगर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुनरिक्षण कार्यक्रमानंतर मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध करण्याची तारीख ही 5 जानेवारी असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी कार्यक्रम महत्त्वाचा आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी निर्दोष मतदार यादीच्या या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले. तर दुसरीकडे वय वर्ष 15 च्या पुढे असलेल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने आगाऊ मतदार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवार रोजी मतदार पुनरिक्षण यादी कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी भोसले बोलत होते.यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, एक जानेवारी 2023 या तारखेवर आधारित मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.ज्यांचे अठरा वर्षे वय पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादी मध्ये नाव नाही अशा व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी संबंधित फॉर्म नमुना सहा हा भरून द्यावा. तसेच ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सुद्धा मतदारांची नोंदणी करता येणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये मतदार यादी ज्या मतदारांचे नाव दुबार आहे अशा मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारण वास्तव्यास करतो. त्या ठिकाणी मतदार यादीत नाव कायम ठेवून उर्वरित ठिकाणची नावे वगळण्यासाठी सुद्धा संबंधित फॉर्म भरून द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मतदार निरीक्षण कार्यक्रम हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.दावे व हरकती स्वीकारण्यासाठी कालावधी नऊ नोव्हेंबर ते 8 डिसेंबर असा देण्यात आलेला आहे. तर विशेष मोहिमेचा कालावधी चार दिवसासाठी देण्यात आला.

दावे व हरकती निकालात काढण्यासाठी 26 डिसेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर अंतिम मतदार यादी ही 5 जानेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील 3722 मतदान केंद्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे. आपले नाव मतदार यादी मध्ये आहे की नाही याची सुद्धा खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदर मतदार यादी ही जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 18 लाख 50 हजार 954 हे पुरुष, तर 17 लाख 6 हजार 127 महिला आणि इतर 185 असे एकूण 35 लाख 57 हजार 266 असे जिल्ह्यामध्ये मतदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वय 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना आता ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीसाठी एप्लीकेशन करता येणार आहे असताना त्याला नाव नोंदवावी लागणार आहे. आगाऊ मतदार नोंदणी करता अर्ज करण्याची सुविधा ही पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता पंधरा वर्षाच्या पुढील मुलांना आपली नोंदणी करता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. त्या मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित मतदान अधिकारी त्याची खात्री करूनच ते नाव समाविष्ट करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.