आभाळमाया – ‘डार्ट’चा डेटा आला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

गेल्या 27 सप्टेंबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अंतराळी इतिहास घडला. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या एका अशनीचा वेध ‘डार्ट’ नावाच्या यानाने घेतला. त्याचं नाव डायडिमॉस. या लघुग्रहाला जो उपग्रह किंवा ‘चंद्र’ आहे त्याचं नाव डायमॉर्फस, तर लक्ष्य होतं ते डायडिमॉसभोवती 11 तास 55 मिनिटात प्रदक्षिणा करणाऱ्या डायमॉर्फस ‘चंद्राचं.’ ‘डार्ट’ म्हणजे, ‘डबल अॅस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ नावाच्या यानाने डायमॉर्फसला चक्क धडक द्यायची, असा नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी 2021 च्या नोव्हेंबरात ‘डार्ट’ पृथ्वीपासून 71 लाख किलोमीटर दूरच्या अशनीकडे निघालं होतं. अगदी योग्य कामगिरी बजावत ते 27 सप्टेंबरला ‘डिमॉर्फस’वर आदळलं.

एरवी एखादी धडक धडकी भरवणारी असते, पण ही मुद्दाम घडवलेली टक्कर, पृथ्वीवासीयांसाठी उपकारक होती. त्याची माहिती आपण मागच्या लेखात घेतली. आता महिनाभरात या ‘डार्ट’ मोहिमेचा निष्कर्ष सांगणारी माहिती (डेटा) समोर आली आहे. ताशी सुमारे 22,530 किलोमीटर वेगाने ‘डार्ट’ यान डिमॉर्फसवर आदळलं आणि त्या लघुग्रहाच्या छोटय़ा चंद्राचा वेग मंदावला! अंतराळातल्या एखाद्या वस्तूला धडक देऊन किंवा टोलवून त्याच्या हालचालीत (मूव्हमेंट) मानवी प्रयत्नातून बदल होण्याची विज्ञानाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याने तिचं महत्त्व अधिक होतं. शिवाय हा सारा खटाटोप आपली पृथ्वी आणि पर्यायाने आपण सारे सजीव यांना अंतराळी धोक्यापासून वाचवण्यासाठी होता. तो कमालीचा यशस्वी ठरला.

डायडिमॉस लघुग्रहाभोवती डिमॉर्फस 11 तास 55 मिनिटात परिक्रमा करायचा. ‘डार्ट’ने धडक दिल्यानंतर अपेक्षेपेक्षा उत्तम काम झालं आणि तब्बल 32 मिनिटांनी डायमॉर्फसची (किंवा डिमॉर्फसची) परिक्रमा लांबली. नासाच्या तज्ञांना वाटलं होतं की, डायमॉर्फसच्या वेगात 73 सेकंदांचा फरक पडला तरी खूप, पण त्याच्या पंचवीस पटीने यश प्राप्त झालं. त्यामुळे हुरुप आलेले ‘नासा’चे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन उद्गारले की, आपल्या मातृग्रहाचं रक्षण करणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. ‘नासा’ तर विश्वाच्या कोणत्याही भागातून येऊ पाहणाऱ्या संभाव्य धोक्याला अटकाव करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहील.

सबंध विश्वाचा आणि त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वीचा विचार करणारे, आपला निळा ग्रह (पाण्यामुळे दिसणारा) वैश्विक आपत्तीपासून वाचवण्यासाठी कटिबद्ध असणारे वैज्ञानिक हे मानवी समाजाचं भूषण असतं. वॉशिंग्टनच्या ‘प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन’चे डायरेक्टर लॉरी गेझ यासंदर्भात म्हणाले की, ‘डिमॉर्फस’चा वेग कमी करण्यात यश आलंय. त्यावरील ‘डार्ट’च्या धडकेमुळे उसळलेला धुरळा आणि दगड-माती यांचाही अभ्यास केला जाईल. या अभ्यासातून भविष्यात पृथ्वीवर आदळू शकणाऱ्या ‘निअर अर्थ’ किंवा ‘पृथ्वी-निकट’ अशनींचा सतत मागोवा घेतला जाईल आणि त्यांचे मार्ग बदलण्याचा यशस्वी उपक्रम हाती घेण्यात येईल.

आता डिमॉर्फस डायडिमॉसभोवती 11 तास 23 मिनिटांतच फिरेल. त्या गणितात दोन मिनिटं मागे-पुढे होऊ शकली तरी डिमॉर्फसचा वेग अर्ध्या तासाने कमी होणं ही लहान गोष्ट नाही.

एकदा एका अशनीला धडक दिली म्हणजे संपलं असं वैज्ञानिक प्रयोगात करता येत नाही. त्यात सातत्य, चिकाटी आणि नित्यनव्या संशोधनाचा सहभाग असतो. म्हणूनच ‘नासा’च्या बरोबरीनेच इटलीच्या स्पेस कार्यक्रमांतर्गत सोडलेला ‘क्यूनसॅट’ हा कृत्रिम उपग्रह तसंच, युरोपीयन स्पेस एजन्सी ऊर्फ ‘ईएसए’ 4 वर्षांनी झेपावणारं ‘हेरा’ हे यान या लघुग्रहाचा अधिक जवळून अभ्यास करणार आहे. तोपर्यंत त्याचं निरीक्षण आणि फोटोग्राफी अंतराळातील ‘हबल’ दुर्बीण करतच आहे. या दुर्बीणीने पाठवलेले डिमॉर्फसचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत.

याशिवाय या प्रकल्पात जगभरच्या अनेक शक्तीशाली दुर्बिणी मदत करणार आहेत. गोल्डस्टोन येथील आणि ग्रीनबॅन्क, स्वॉप तसंच चिलीमधील प्रसिद्ध ला सिला वेधशाळेची दुर्बीण या ‘निअर अर्थ’ संशोधन प्रकल्पात सहभागी असतील, एवढंच नव्हे तर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात बऱ्याच वर असलेल्या डेन्मार्कमधील ‘डॅनिश टेलिस्कोप’ ही यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेत उभारलेल्या दुर्बीणींचंही पृथ्वीला संभाव्य धोका देणाऱ्या अशनींकडे लक्ष आहे.

थोडक्यात, अंतराळातून कदाचित येऊ शकणाऱ्या आपत्तीविरोधात बरीच यंत्रणा सज्ज आहे. ती आपलं रक्षण करेल यात शंका नाही. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक त्यांचं काम अलिप्त कर्तव्य भावनेने करत राहतील आणि अंतराळी धोके उधळून लावतील.

 हे सगळं मानवी समाजाला उत्साह देणारं आहे. एका बाजूला विज्ञान आपली पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, पृथ्वीवरचा ‘प्रगत’ प्राणी काय करतोय तर विध्वंसकारी युद्ध! त्यातच प्रदूषणाच्या वाढत्या प्रभावाने थैमान घातलंय. भरीस भर म्हणून सौर वादळांच्या परिणामांनी पृथ्वीवरचे शीतप्रदेश आता होरपळू लागलेत. पावसाचं तंत्रच बिनसलंय, परंतु सत्ता-मत्ता स्पर्धेत मश्गूल असलेल्या मानवी जगाला त्याचं भान आहे असं दिसत नाही. मात्र आपल्यातलीच चार सुज्ञ माणसं अंतराळी ‘आक्रमणा’पासून आपल्याला वाचवतायत त्याचे ऋणी राहू द्या, इतकंच!

[email protected]