खार रोड स्थानकावर प्रवाशांसाठी एलिव्हेटेड डेकची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या खार रोड स्थानकाचा 64 कोटी रुपयांतून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी एमआरव्हीसीने टेंडर प्रक्रियाही सुरू केली आहे.

एमआरव्हीसीने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. पश्चिम रेल्वेच्या खार रोड स्थानकात पश्चिम दिशेला नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. या नव्या प्लॅटफॉर्मपासून ते प्लॅटफॉर्म क्र.2 च्या वर 200 बाय 22 मीटरचा डेक बांधण्यात येणार आहे. तो सर्व पादचारी मार्गाला जोडलेला असणार आहे. या एलिव्हेटेड डेकला प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने व लिफ्टने जोडले जाणार असून तिकीट घर व एटीव्हीएम मशीन आदी सुविधा डेकवर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एलटीटीत आणखी दोन फलाटांची उभारणी

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पश्चिम बाजूला नवीन आयलँड प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावरून त्यामुळे फलाट क्र.6 आणि 7 असे दोन फलाट लांब पल्ल्याच्या ट्रेन उभारण्यासाठी वर्षभरात मिळणार आहेत. सध्या एलटीटीत पाच फलाट आहेत. नव्या आयलँड फलाटासाठी फलाट क्र.5 च्या शेजारील चार स्टेबलिंग लाईन शिफ्ट करण्याचे काम येथे सुरू करण्यात येणार आहे. या नव्या दोन फलाटांमुळे येथून आणखी लांब पल्ल्याच्या ट्रेन सोडणे शक्य होणार आहे.