
यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या मराठी भाषेतील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या मराठी पुस्तकाचा वितरण सोहळा 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे बारा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. मराठी भाषेमधील प्रथम वर्षाची अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची 9 व पदविका अभ्यासक्रमांची 11 अशा एकूण 20 पुस्तकांची निर्मिती एआयसीटीईकडून करण्यात आलेली आहे. त्याचे वितरण केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी हॉल येथे सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण डॉ. सुभाष सरकार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, संचालक, उच्च शिक्षण सचिव, विकासचंद्र रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवीन शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजीव्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे यासाठी मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.



























































