माणूस आणि ऑक्टोपसचे पूर्वज एकच होते, शास्त्रज्ञांचा अभिनव शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीवर राहणारा माणूस आणि समुद्रात राहणारा आठ पायांचा ऑक्टोपस हे तसे दोन वेगवेगळे जीव आहेत. पण, या दोघांचाही पूर्वज एकच असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. सुमारे 518 लाख वर्षांपूर्वी हे पूर्वज पृथ्वीवर अस्तित्वात होते.

जर्मनीची राजधानी बर्लिन येथील मॅक्स डेलब्रुक संस्थेच्या एका नवीन संशोधन अहवालानुसार, या जिवाचं नाव फेसिवर्मिस युन्नानिकस असं आहे. हा जीव सुरुवातीला ऑक्टोपससारखाच दिसत होता. जसजशी उत्क्रांती झाली तसतसा त्याचा उपयुक्तता नसलेला एक एक अवयव गळून पडत गेला. या जिवाची बौद्धिक क्षमताही खूप कमी होती.

ऑक्टोपस आणि माणूस यांचा मेंदू जवळपास समान असतो. अनेक समुद्री जिवांमध्ये असे काही मायक्रोआरएनए असतात, जे मेंदूत असलेल्या कोशिकांच्या संख्येइतकेच असतात. मायक्रोआरएनए एकप्रकारचे जनुक असते जे मेंदूच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका निभावतं. तेच जनुक मानवी मेंदूचा सगळ्यात जटिल भाग असतं. तशाच प्रकारचं जनुक ऑक्टोपसच्या मेंदूत आढळतं.

त्यामुळेच ऑक्टोपस हा अतिशय बुद्धिमान जीव आहे. समुद्रातील इतर जीव किंवा घटक, उपकरणं यांच्या साहाय्याने तो स्वतःचं आणि स्वतःच्या घरट्याचं रक्षण करतो. संरक्षणासाठी नारळाच्या करवंटीत लपू शकतो, आपल्या घरट्याच्या संरक्षणासाठी खडकांना पाडू शकतो आणि जेलीफिशच्या जाळ्याचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवतो. इतकंच नव्हे तर कोडीही सोडवू शकतो. ऑक्टोपस एकमेकांवर दगडफेकही करत असल्याचा एक व्हिडीओ मिळाला आहे.