हिमालयातील वीकेंड ट्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालयातील पर्वतरांगा गिरीप्रेमींना नेहमीच खुणावत असतात. पर्वतरांगांमध्ये नवीन उंची गाठणे आणि त्यांचा एक भाग बनून राहणे, हा एक रोमांचकारी अनुभव असतो. दऱयाखोऱयांत हिंडण्याचे वेड असणारे गिरीभ्रमंतीसाठी उत्सुक असतात. वीकेंड ट्रेक करू इच्छिणाऱयांसाठी तर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये खूप ठिकाणं आहेत. अगदी एक-दोन दिवसांत हे ट्रेक सहज करता येतात. अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊया.

नाग तिब्बा ट्रेक

नाग तिब्बा हे उत्तराखंडातील 9,915 फूट उंचीवरील शिखर आहे. हा लहान ट्रेक असून त्यामध्ये डेहराडून आणि उत्तराखंडमधील 20 किलोमीटर अंतराचा समावेश होतो. नाग तिब्बा ट्रेक दोन दिवसांत पूर्ण करता येतो. जर तुम्हाला पर्वतरांगा चढायच्या आहेत, जंगल क्रॉसिंगचा थरार, बर्फाच्छादित डोंगर आणि सुंदर सूर्यास्त अनुभवयाचा असेल तर हा ट्रेक उत्तम आहे. ट्रेकदरम्यान गंगोत्री, केदारनाथ अशा सहा पर्वत शिखरांमध्ये कॅम्प लावू शकता. देहरादून ते पंतवारी गाव हे नागमोडी वळणारे अंतर पार करताना यमुना नदीसोबतही प्रवास होतो.

त्रिउंड ट्रेक

त्रिउंड हे हिमालयातील धौलाधार रेंजमध्ये आहे. त्याच्या एका बाजूला भव्य धौलाधार पर्वतरांगा तर दुसऱया बाजूला कांगरा व्हॅली आहे. पहिल्यांदा ट्रेकिंग करणाऱयांसाठी तर त्रिउंड ट्रेक उत्तमच. ट्रेक मॅक्लोडगंजपासून सुरू होतो. तो सहा-सात तासांत पूर्ण करता येतो. त्यामुळे वीकेंड ट्रेकसाठी हा उत्तम पर्याय आहे. उंच डोंगर आणि त्यामधून वाहणारे झरे वाटेवर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात.

प्रशार लेक ट्रेक

प्रशार तलाव कुलू खोऱयांत धौलाधार पर्वतरांगांनी वेढलेला आहे. वर्षातून कधीही प्रशार लेक ट्रेक करता येईल. पानारसा येथून ट्रेकला सुरुवात होते. आपण दोन दिवसांत 15 किलोमीटर अंतर कापून 8,900 फूट उंचीवर पोचतो. पीर पंजाल, धुलंदर आणि किन्नउरचे 180 अंशातून विहंगम दर्शन होते.

हिमाचल प्रदेशातील या स्थळाला अद्याप म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळे तिथे पोचणाऱया पर्यटकांची संख्या कमी असते. दाट जंगले आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. प्रशार लेकच्या मधोमध तरंगतं बेट आहे. तलावाजवळ कॅम्प उभारता येतो, ही तर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. रात्रीच्या वेळी आकाशभर चांदण्यांचे प्रतिबिंब निळय़ाशार पाण्यात पडतं. तलावाच्या काठी बसून हे विहंगम दृश्य नजरेत टिपता येते.

प्रशार लेक ट्रेक करण्यासाठी फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि सप्टेंबर हे सर्वोत्तम महिने आहेत. हिमवर्षाचा आनंद घेण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळय़ाच्या महिन्यात जा.