
सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) – सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून येथील प्रसिद्ध डॉक्टरची तब्बल 35 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्याने डॉक्टरांची फसवणूक केली तो संशयित आरोपी सध्या नागपूर कारागृहात असून, त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मनीष अशोक अग्रवाल (वय 19, रा. प्रतीकनगर, पुणे, मूळ रा. कोलकाता) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
येथील प्रसिद्ध डॉक्टरांना सीटी स्कॅन मशीन खरेदी करायची होती. यासाठी त्यांनी पुण्यातील एका बँकेत कर्जप्रकरण केले होते. त्यावेळी तेथे मनीष अग्रवाल हा एजंट म्हणून काम करत होता. अग्रवाल याने संबंधित डॉक्टरांकडून विविध कारणे सांगून पैसे उकळण्यास सुरुवात केली. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तो पैसे उकळू लागला. एवढेच नव्हे तर वर्षभरापूर्वी तो कोलकात्याला कुटुंबासह गेला होता. त्यावेळी त्याला पुण्यात विमानाने येण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने डॉक्टरांना 69 हजारांचे विमानाचे तिकीट काढण्यास सांगितले. डॉक्टरांनीही लवकर कर्ज मंजूर होईल, या आशेने त्याचे विमानाचे तिकीट काढले. वर्षभरात डॉक्टरांनी मनीष अग्रवाल याला 35 लाख 2670 रुपये दिले.
दरम्यान, अग्रवाल याने अशाच प्रकारे अन्य काही लोकांना फसविल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. नागपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. सध्या तो नागपूरच्या कारागृहात आहे. त्याने अनेकांना फसविल्याचे साताऱयातील डॉक्टरांनाही समजल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. उपनिरीक्षक सुधीर मोरे हे तपास करीत आहेत.
सातारा पोलीस घेणार ताबा
नागपूर कारागृहात असलेला मनीष अग्रवाल याचा ताबा आता सातारा पोलीस घेणार आहेत. त्याने सातारा जिह्यात अशाप्रकारे आणखी कोणाला फसविले आहे का, याची पोलीस चौकशी करणार आहेत.






























































