कुपवाडच्या भुयारी गटार योजनेला अखेर मंजुरी ,सांगली मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाच्या अमृत-2 अभियानातून कुपवाड भुयारी गटारच्या 253 कोटी 41 लाखांच्या योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. कुपवाड शहरासह विजयनगर, वान्लेसवाडी, वारणाली, भारती विद्यापीठ परिसरासह भविष्यातील सुमारे 4 लाख लोकसंख्या गृहीत धरून आराखडा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर याला यश आले आहे. महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी ही योजना आहे. महिनाभरात या योजनेची निविदा काढण्यात येणार आहे.

 कुपवाड भुयारी गटार योजना 253 कोटी 41 लाख 53 हजारांची आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 84 कोटी 46 लाख, राज्य शासनाचा 92 कोटी 92 लाख, तर महापालिकेचा 67 कोटींचा हिस्सा आहे. या योजनेचा आराखडा तयार करताना भविष्यातील 4 लाख 3 हजारांची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. कुपवाड शहरासह अहिल्यानगर, यशवंतनगर, बालाजीनगर, वारणाली, गंगानगर, गव्हर्नमेंट कॉलनी, भारती विद्यापीठ परिसर, विजयनगरसह प्रभाग क्रमांक 1, 2, 8 व 19 मधील सर्व भाग, तर प्रभाग क्रमांक तीनमधील काही भागांचा यामध्ये समावेश असणार आहे. 150 ते 1200 मिमी व्यासच्या सुमारे 270 किलोमीटर वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तर, अहिल्यानगर, तुळजाईनगर व कुंभारमळा येथे पंपिंग स्टेशन होणार आहेत. तर कुंभार मळा येथील 2.9 एकर जागेमध्ये 27 एमएलडी क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.

 मलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी 1200 मीमी व्यासाच्या आरसीसी पाइपद्वारे ओढय़ात सोडण्यात येणार आहे. या योजनेची महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची अट असणार आहे. या योजनेचे काम तीन टप्प्यांत होणार असून, केंद्र-राज्य शासन 70 टक्के म्हणजे 177 कोटींचा निधी देणार आहे. पहिल्या टप्प्यात 20, दुसऱया टप्प्यात 40 तर तिसऱया टप्प्यात 40 टक्के निधी शासनाकडून मिळणार असल्याचे स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.

 योजनेची वैशिष्टय़े

  4 लाख लोकसंख्या गृहीत धरून आराखडा , केंद्र, राज्य 70, तर मनपाचा 30 टक्के हिस्सा , दोन वर्षांत होणार काम पूर्ण , वॉर्ड 1,2,3,8,19 मध्ये होणार गटारीचे काम, 270 किलोमीटरची वाहिनी, तीन पंपिंग स्टेशन उभारणार , कुंभारमळा येथे मलशुद्धीकरण केंद्र