

लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण. फडावरच्या लावणीला बाईनी आपल्या सुसंस्कृत सादरीकरणाने खानदानी .. आबदार केले.. आणि लावणीकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोनच बदलला.. या घरंदाज लावण्यवतीला मानाचा मुजरा!!
लावणी.. महाराष्ट्राचे अतिशय समृध्द लोकवैभव.. या वैभवाला अनेकांनी आपापल्या कलेचा साज चढवला.. देखण्या लावणीची भुरळ प्रत्येकालाच पडून अगदी पुरुष शाहिरांनीही लावणीच्या लावण्यावर असंख्य कवने रचली.. अनेक लावण्यवतींनी आपला नृत्यसाज लावणीला अर्पण केला.. पण दोन घरंदाज लावण्यवतीनी लावणीला खऱ्या अर्थाने आबदार आणि स्वत:प्रमाणेच घरंदाज बनविले. यापैकी एक म्हणजे लीला गांधी आणि दुसरे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.. ज्या नावाने ठसकेबाज लावणीला अत्यंत सोज्वळपणे सादर केले.. शृंगारिक लावणीचा शृंगार त्यांच्या अंगभर घेतलेल्या पदराने सलज्ज आणि खानदानी केला.. सुलोचना चव्हाण.. खुद्द आचार्य अत्र्यांनी सुलोचानाबाईना लावणीसाम्राज्ञी हा किताब बहाल केला. त्यांच्या जाण्याने लावणीचे खानदानीपण खऱ्या अर्थाने लोपले.. लावणीच्या भरजरी पदरावरचा जरतारी नाचरा मोर कायमचा थबकला.. आणि आपल्या रंगभूमी सदराने केवळ नाटकापुरते मर्यादित न राहता सुलोचनाबाईंच्या जाण्याची दखल घेण्याचे ठरविले.. कारण रंगभूमी या शब्दाची व्याख्या खूप व्यापक आहे. प्रत्येक कलावंत आपापली कला या रंगभूमीच्या माध्यमातून नटराजाच्या चरणी अर्पण करीत असतो.. आणि सुलोचनाबाईंच्या घरंदाज लावणीवर तर देव नटराजाने आपली कृपादृष्टी कायम ठेवली आहे.

सुलोचानाबाईना भेटायचा.. त्यांची मुलाखत घेण्याचा योग खूप वेळा आला.. प्रत्येक वेळेस मनास भुरळ घातली त्यांच्या साधेपणाने.. तसेच व्यासपीठावर त्यांचे नखरेबाज लावणीचे आदबशीर सादरीकरण.. संपूर्ण अंगभर पदर घ्यायचा.. चोळी दिसू द्यायची नाही.. ही आईची शिकवण.. सुलोचनाबाईनी आयुष्यभर जपली.. महादेव विठ्ठल कदम आणि राधाबाई महादेव कदम या गिरगावात फणसवाडीत राहणाऱ्या जोडप्याच्या पोटी जन्मलेल्या सुलोचनाबाई लहानपणी बबन या टोपणनावाने ओळखल्या जात असत.शिक्षणाची फारशी गोडी नाही..तरी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतले.. घरात ग्रामोफोन होता.त्यावर छोटी बबन आईसोबत गाणी ऐकायची.. तिचे सर्वात आवडत गाणे म्हणजे वत्सलाबाई कुमठेकर यांची लावणी.. पण लावणी ऐकते म्हणून सुलोचानाबाईनी आईचा खूप ओरडा खाल्ला आहे. बाईंचे थोरले बंधू दिनाअण्णा यांचा संगीत मेळा होता. त्यात बालगीते, गरबा, देशभक्तीपर गीते गायली जात असत. मेळ्याचे रंगभूषाकार होते त्यांनी बबनला गुजराती नाटकात नृत्य करायला नेले. त्यातून थोडीफार कमाई होऊ लागली.. पुढे सुलोचनाला चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. गायिकेला नाव दिले गेले सुलोचना के. पुढे सतत हिंदी चित्रपटांत गाता गाता मराठी चित्रपटात गाण्याची पहिली संधी दिली संगीतकार वसंत देसाई यांनी. आचार्य अत्र्यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटासाठी. लावणीचे बोल होते खुद्द अत्र्यांचे. लावणी हंसा वाडकरांवर चित्रित झाली होती. लावणी ऐकताक्षणी आचार्य अत्र्यांनी सुलोचनाबाईना पदवी दिली “लावणी साम्राज्ञी”. हा बहुमान सुलोचनाबाईंनी जीवापाड जपला.. सांभाळला.. आणि सार्थ ठरविला.. लावणीचे लावण्य आपल्या अभिजात आवाजाने खुलवले.. वाढवले.. तिला शालीनतेचा साज चढविला..
कोल्हापूरचे शामराव चव्हाण. सहायक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करत होते.. त्यांनी कलगी तुरा चित्रपटाची तयारी चालविली होती. संगीतकार के. दत्ता यांनी सुलोचनाला गाण्यासाठी बोलाविले. चव्हाणांना वाटे रोजच केसात गजरा, फुले माळणारी ही मुलगी नक्कीच दक्षिणी असणार. पुढे या अस्सल मराठी मुलीची आणि दिग्दर्शकाची प्रेमकथा फुलली आणि सुलोचना के. सुलोचना चव्हाण झाल्या.
या जोडीने आपल्या अनोख्या ढंगात लावणी अक्षरश: देशभरात, जगभरात पोहोचविली. सुलोचनाबाई लावणी गात राहिल्या खास त्यांच्या पद्धतीने.. पांढरीशुभ्र काठपदराची साडी.. डोईवरून अंगभर घेतलेला पदर.. आणि अखंड साथ करणारे शंकरराव चव्हाण. यामुळे बाईंच्या लावणीला एक वेगळेच परिमाण मिळाले. अस्सल रसिक रामूभय्या दाते बाईंची लावणी ऐकून म्हणाले.. “ काय हो.. मोठ्ठे कुंकू लावून, डोक्यावर पदर घेऊन लावणी म्हणता.. डोळे बंद करून ऐकले तर वाटते.. समोर कोणी फटाकडी अदा करून गाणे म्हणते आहे..” यावर सुलोचनाबाई म्हणाल्या.. मी नृत्य जाणते.. लावणी म्हणताना माझ्यातील नर्तकी मनातल्या मनात नाचत असते.. तिच्यावर मी माझ्या शब्दांची.. स्वरांची उधळण करीत असते.. पण गाणे संपले की मी कमळाच्या पानासारखी कोरडी.. निर्लेप.. म्हणूनच बाईंची प्रतिमा अत्यंत स्वच्छ.. आणि शालीन राहिली..
एकदा एका कार्यक्रमात बाईंच्या होळीच्या लावणीवर प्रेक्षकांनी पैसे फेकण्यास सुरुवात केली.. त्याक्षणी सुलोचनाबाईनी गाणे थांबविले, आणि प्रेक्षकांना सांगितले.. की हा प्रकार थांबला नाही तर मी या क्षणी हा कार्यक्रम थांबवून निघून जाईन. पुन्हा त्यांच्या कार्यक्रमात कोणी पैसे उधळले नाहीत.
सुरुवातीला महिला प्रेक्षक लावणीच्या कार्यक्रमाला येत नसत. पण बाईंची प्रतिमा कानावर येऊन महिलाही कार्यक्रमाला येऊ लागल्या.
आपला हा साधेपणा बाईनी आयुष्यभर जपला. लोणची, पापड, मसाले सारे घरी करण्याची हौस.. विणकाम, शिवणकाम सतत हातात सुरु. पती शामराव चव्हाणांना त्या गुरुस्थानी मनात.. कारण लावणी कशी गायची हे त्यांनीच शिकवले. त्यावेळी एका चित्रपटातील सगळी गाणी सुलोचनाबाई एका दिवसात ध्वनिमुद्रित करीत. मल्हारी मार्तंड या चित्रपटाचे ध्वनिमुद्रण संपल्यावर व्ही. शांताराम स्टुडीओत आले. त्यांनी विचारले किती गाणी झाली..? सगळ्या दहाच्या दहा गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले असे समजल्यावर शांतारामबापूंनी बाईंकडे पाहिले आणि म्हणाले, “सुलोचना तुला भुताने झपाटले आहे का ग..”
खडा धारदार आवाज.. गाण्यावर.. स्वरांवर सच्ची निष्ठा.. आईचे संस्कार या साऱ्यांतून सुलोचनाबाईंची लावणी अस्सल ठरली.. तिच्या मोहक अदांवर सात्विक शालीनतेचा साज चढूनही तिचा ठसका अजिबात कमी झाला नाही.. त्यांची लावणी नेहमीच आबदार.. सुसंस्कृत.. शालीन आणि फक्कड झाली.. या लावणी साम्राज्ञीला मानाचा मुजरा..!




























































